“प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी”चंद्रकांत पाटलांचं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जाहीर आव्हान.

maharashtra-news/bjp-chandrakant-patil-on-mahavikas-aghadi-shivsena-ncp-congress

आमची सगळ्या गोष्टींची तयारी असून पाच वर्षाच सरकार चालवलं तर प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची तयारी आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलं आहे. हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळं लढा असं जाहीर आव्हानही त्यांनी दिलं आहे. “पण तुमच्यात हिंमत नाही. कशाचा कशाला पत्ता नाही. झेंडा वेगळा, तत्व वेगळी आणि एकत्र लढता. आम्हाला काही फरक पडत नाही,” असंही ते म्हणाले आहेत. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

“भाजपावर टीका करणं हे संजय राऊतांचं कर्तव्य आहे. ते त्यांनी बजावलं पाहिजे. त्यामुळे तर त्यांची पक्षात आहे ती जागा आहे. त्यामुळे संजय राऊतांनी टीका केल्यावर काही आश्चर्य वाटत नाही. आमच्यावर अनेकदा अग्रलेखही असतात, त्यामुळे त्यात काही विशेष नाही,” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देणं टाळलं.

“शरद पवारांचा सल्ला घेतात ही आनंदाची गोष्ट आहे. शरद पवार महाराष्ट्र चालवतात, उद्धव ठाकरे नाही हे त्यांनी मान्यच केलं आहे. आता ते पवारांचा सल्ला घेऊ देत किंवा पार्थ पवारांचा घेऊ देत,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

संजय राऊतांनी निवडणूक आयोग भाजपाची शाखा असल्याची टीका केली आहे. त्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “आपल्या बाजूने निर्णय झाला की सगळं चांगलं. अजित पवार आणि फडणवीसांनी शपथ घेतली आणि केस सुप्रीम कोर्टात गेली. असं म्हणू नये पण सुप्रीम कोर्टाने आमच्यावर अन्याय केला. एकाला मिळालेला न्याया दुसऱ्यासाठी अन्याय असतो. त्यावेळी सुप्रीम कोर्ट चांगलं, विरोधात निर्णय गेलं की वाईट. पंजाब निवडणुकीत विजय झाला की निवडणूक आयोग चांगलं, नाही तर वाईट….हे त्यांचं सोयीचं राजकारण आहे”.

महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण होत असून यावेळी चंद्रकांत पाटलांनी कामगिरीला शून्य मार्क दिले. ‘सरकार चालवताना करोनाचा जो मोठा कालावधी गेला त्यात काय झालं हे सर्वसामान्यांना विचारा. मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांना, पश्चिम महाराष्ट्रात कर्ज वेळेवर भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळालं का विचारा,” असं ते म्हणाले.

पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचं कौतुक करण्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मीदेखील अनेक वेळा शरद पवार या वयात किती प्रवास करतात, शेती आणि सहकार विषयातलं ज्ञान यासंबंधी सांगत असतो. आम्ही मंत्री असताना सामान्यांसाठी फोन करुन ते चर्चा करायचे. आता चांगल्याला चांगलं म्हणणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आम्ही ची उचलली आहे. पण महाविकास आघाडीने उचलली नाही. फडणवीसांनी केलेलं सगळं रद्द केलं”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.