‘सीसीटीएनएस’च्या वापरात महाराष्ट्र पोलीस अव्वल

पोलीस विभागाचे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) देशभरात सीसीटीएनएस यंत्रणा अंमलात आणली. सीसीटीएनएसची अंमलबजावणी व त्याच्या हाताळणीत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असून ही महाराष्ट्र पोलिसांकरिता अभिमानाची बाब आहे.

पोलीस ठाण्याचे अहवाल, गुन्हेगार, गुन्ह्यंची नोंद आदी माहिती पूर्वी रजिस्टरमध्ये नोंद असायची. पण, पोलीस ठाण्यातील व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी एनसीआरबीने देशात आयसीजेएस व सीसीटीएनएस ही यंत्रणा लागू केली. याअंतर्गत पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, अभिलेखावरील गुन्हेगार यांची माहिती ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तशी यंत्रणा विकसित झाली. त्याशिवाय गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, पासपोर्ट चारित्र्य पडताळणी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन आदींचीही माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येते. यामुळे देशातील कोणत्याही ठिकाणी गुन्हा घडल्यास संबंधित व्यक्तीचे अहवाल ऑनलाईन उपलब्ध राहात असल्याने गुन्हे प्रकटीकरणात त्याचा फायदा होतो.

आयसीजेएस व सीसीटीएनएसचा वापर करण्यात महाराष्ट्र अव्वल आहे. १५ ते १६ डिसेंबर या दरम्यान नवी दिल्ली येथे एनसीआरबीकडून ‘गुड प्रॅक्टिस इन सीसीटीएनएस, आयसीजेएस’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. यात सीसीटीएनएसची अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र पोलिसांना प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. ही महाराष्ट्र पोलिसांच्या आधुनिकेतचा गौरव असल्याची माहिती राज्य गुन्हे अन्वेषणचे (सीआयडी) प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

१५७३ गुन्ह्यांचा छडा

राज्यभरात हजारो गुन्हे घडतात. पण, त्यांचा छडा लावताना गुन्हेगारांची माहिती उपलब्ध होणेही आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलिसांनी सीसीटीएनएस व आयसीजेएस या प्रणालीचा वापर करून १ हजार ५७३ गुन्हे उघडकीस आणले. चोरलेल्या ७४३ मालमत्तांचा शोध लावला, ६९३ बेवारस मृत्यू व हरवलेल्या व्यक्तींची शोध घेतला, ७ हजार ८८३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आधारावर ५०७ प्रकरणांमध्ये आरोपींचे जामीन फेटाळले गेले, १३ हजार ७२१ लोकांची  पडताळणी करण्यात आली असून पडताळणीवेळी ४ हजार ६०१ लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निष्पन्न झाले. त्याशिवाय  १ लाख १७ हजार २६ पारपत्र व चारित्र्य पडताळणी करण्यात आली असून त्यापैकी २ हजार ८३७ प्रकरणांत गुन्हे दाखल असल्याची समोर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.