सर्वांच्या सहभागातून जिल्ह्यात ‘माझी वसुंधरा’ अभियान

Share This News

 नागपूर
ग्रामीण भागातील ग्राम पंचायत, नगर परिषद, नगर पंचायतींसह शहरीभागातील महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या सहभागातून निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्‍वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात राज्यात अव्वल क्रमांक मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने कामांचे नियोजन करण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, भिवापूर, हिंगणा, कुही, महादुला, मौदा व पारशिवणी या नगर पंचायत, नागपूर महानगरपालिका तसेच १0 हजारांवर लोकसंख्या असलेल्या काटोल तालुक्यातील कोंढाळी व नागपूर (ग्रा.) मधील खरबी या गावांची निवड करण्यात आली आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबरपासून ते ३१ मार्च २0२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाचे मूल्यमापन होणार असून यासाठी विविध वर्गवारीत १५00 गुण आहेत . त्यामध्ये पृथ्वी ६00 गुण , वायू १00 गुण , जल ४00 गुण , अग्नी १00 गुण , आकाश ३00 गुणांचा समावेश आहे. पृथ्वी पंचतत्त्वांनुसार सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन नवीन हरितक्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्यात येत आहे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी केले जाणार आहे. जल पंचतत्त्वानुसार तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन तलावांसह सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग, असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. अग्नी तत्त्वांनुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर व बचत, अपारंपरिक ऊर्जानिर्मिती, बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जेवर एलईडी दिवे लावण्याचे नियोजन आहे. विद्युत वाहनाकरिता चार्जिंग पाईंट निर्माण करण्यात येणार आहे.
आकाश तत्त्वानुसार स्थळ आणि प्रकाश या स्वरूपात मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रसार केला जाणार आहे. या अभियानात नागपूर महापालिका, न.प., नगर पंचायत व ग्राम पंचायत क्षेत्रात अनेक वस्त्यांचा झपाट्याने विस्तार होत आहे. तेथील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.