मी शिवसेनेच्या आक्रमकतेला जुमात नाही, राणेंची टीका

मुंबई : मी शिवसेनेच्या आक्रमकतेला जुमानत नाही, आम्ही डबल आक्रमक आहोत असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. नारायण राणेंनी जी शिवसेना सोडली ती शिवसेना गेली अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. मी आता रस्त्याने जाणार आहे, काय होते पाहूया असे आवाहन यावेळी त्यांनी शिवसेनेला दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर नारायण राणे यांनी चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी मी अशा शिवसैनिकांना भीक घालत नाही म्हटले. नारायण राणे यांना अटकेच्या आदेशासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा. नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार. गुन्हा नसताना पथक निघाले, अटक होणार सांगितले जात आहे. मी काय साधा माणूस वाटलो का?,” अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन असा इशारा यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला.
“आम्ही समर्थ आहोत. दोन दगड मारुन गेले असतील तर त्यात पुरुषार्थ नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी नाशिकमधील तोडफोडीच्या घटनेवर दिली. “ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोबाड फोडण्याचे वक्तव्य केले होते तेव्हा तो गुन्हा नव्हता का? मग त्यावेळी गुन्हा दाखल का झाला नाही?,” अशी विचारणा नारायण राणेंनी केली.
देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणे हा देशाचा अपमान, राष्ट्रद्रोह आहे अशी टीका करताना नारायण राणे यांनी मी असतो तर… ऐवजी आत्ता कानफाड फोडेन असे म्हणालो असतो तर तो गुन्हा ठरला असता असा युक्तिवाद केला. मी या देशाचा केंद्रीय मंत्री आहे. काय चेष्टा लावली आहे असेही यावेळी ते म्हणाले.
शिवसेनेकडून टार्गेट केले जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “मी अशा शिवसैनिकांना भीक घालत नाही. कोण आहेत ते…समोर उभे तरी राहावे”. “पोलिसांनी पत्र दिले नसून नोटीस दिली आहे, त्यात फरक आहे. आदेश काढायला तो काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे? मी जे बोललो तो गुन्हा नाही..तपासून पाहावे,” असे यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांना सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “पोलिसांची तत्परता आदेशामुळे आहे. आमचे पण सरकार वरती आहे. हे कुठपर्यंत उडी मारतात पाहूयात”. जन आशीर्वाद यात्रा वेळापत्रकाप्रमाणे जाणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच मी शिवसेनेच्या आक्रमकतेला जुमानत नाही. आम्ही डबल आक्रमक आहोत असे यावेळी ते म्हणाले. नारायण राणेंनी जी शिवसेना सोडली ती शिवसेना गेली अशी टीका यावेळी त्यांनी केली. मी आता रस्त्याने जाणार आहे, काय होते पाहूया असे आवाहन यावेळी त्यांनी दिले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.