नूतन परदेशी व्यापार धोरणावर संसदीय सल्लागार समितीत चर्चा

नूतन परदेशी व्यापार धोरण 2021-26’ वर चर्चा करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योगविषयक संसदीय सल्लागार समितीची बैठक मंगळवारी घेण्यात आली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला समिती सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी संसद  सदस्यांना नव्या परदेशी व्यापार धोरणाविषयी माहिती देण्यात आली. बैठकीत संसद सदस्यांनी अनेक सूचना आणि प्रस्ताव दिले. या सूचनांचे स्वागत करत, त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन पुरी यांनी दिले.

भारताचे परदेशी व्यापार धोरण पारंपारिकरीत्या पाच वारशातून एकदा तयार केले जाते.याधीचे धोरण  2015-20 या कालावधीसाठी होते, मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर या धोरणाला एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.नूतन परदेशी व्यापार धोरण एक एप्रिल 2021 पासून लागू होईल. आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताला नेतृत्वक्षम बनवण्यासाठी आणि व्यापारी तसेच सेवांच्या निर्यातीतून मिळालेल्या लाभांचा वापर देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत रोजगार निर्मितीसाठी केला जाईल, जेणेकरुन, भारताला पाच ट्रिलीयन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाल्यास भारताला हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. त्यासाठी, देशांतर्गत आणि परदेशी व्यापारी तसेच गुंतवणूकदारांच्या समस्या आणि तक्रारी लक्षात घेऊन, त्यांचे निवारण करणे, उद्योग सुलभ वातावरण निर्माण करणे, कमी खर्चिक आणि लॉजिस्टिक तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, अशा उपाययोजना केल्या जातील.

नव्या परदेशी व्यापार धोरणाचा महत्वाचा घटक, जिल्हा निर्यात केंद्रे हा असेल. वाणिज्य मंत्रालय राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या केंद्रांच्या स्थापनेची प्रक्रिया टप्याटप्याने केली जाईल. या केंद्रांच्या माध्यमातून देशाची निर्यातक्षमता पूर्णपणे वापरणे शक्य होईल. नव्या परदेशी व्यापार धोरणाची आखणी करण्यासाठी सबंधित लोकांशी सातत्याने बैठका होत आहेत. त्या बैठकांमधील चर्चेची माहितीही यावेळी देण्यात आली. या धोरणाबाबत आतापर्यंत 2000 सुधारणा/सूचना आल्या असून त्या सर्व सूचनांची दखल घेत नवे धोरण तयार केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.