अभिनेत्री मीनू मुमताज यांचे निधन

टोरंटो (कॅनडा) 23 ऑक्टोबर : जुन्या हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मीनू मुमताज यांचे कॅनडाच्या टोरंटो शहरात आज, शनिवारी सकाळी निधन झाले. मृत्यू समयी त्या 79 वर्षांच्या होत्या. विनोदी अभिनेते महमूद यांच्या त्या भगिनी होत्या.

मीनू मुमताज यांचा जन्म 26 एप्रिल 1942 रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी बालपणी डान्सचे प्रशिक्षण घेतले होते. देविका रानी यांनी मीनू यांना बॉम्बे टॉकीजमध्ये डान्सर म्हणून काम करण्याची संधी दिली. मीनू मुमताज यांचे खरे नाव मालिकाउन्निसा अली असे होते. जेव्हा त्यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरूवात केली तेव्हा अभिनेत्री मीना कुमारी यांनी त्यांचे नाव बदलून मीनू मुमताज केले. मीनू मुमताज यांनी ‘घर घर में दीवाली’ या चित्रपटमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट 1955 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये मीनू मुमताज यांनी गावामध्ये राहणाऱ्या एका नृत्यांगनाची भूमिका साकारली होती. ‘सखी हातिम’ या चित्रपटामुळे मीनू यांना विशेष लोकप्रियता मिळाली.

मीनू यांनी गुरु दत्त यांच्या ‘कागज के फूल’, ‘चौदहवीं का चांद’ आणि ‘साहिब बीबी और गुलाम’ या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच ताज महल, घूंघट, इंसान जाग उठा, घर बसाके देखो, गजल, अलीबाबा, अलादीन, धर्मपुत्र आणि जहांआरा या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. मीनू यांनी दिग्दर्शक सैयद अली अकबर यांच्यासोबत 1963 मध्ये लग्न केले. त्यांना 4 अपत्य असून त्या कॅनडातील टोरंटो शहरात स्थायिक होत्या.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.