रेकॉर्ड ब्रेक! नितीन गडकरींचा विक्रमही अभिजित वंजारींनी मोडला

राज्यात नुकत्याच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीत महाविकास आघाडीनं दणदणीत यश मिळवलं आहे. पण, सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजयाची. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये महाविकास आघाडीनं हा विजय नोंदवला आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली होती. वंजारी यांनी नितीन गडकरींनाही मागे सोडत रेकॉर्ड ब्रेक विजय संपादीत केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघात विजय मिळवतानाच दोन विक्रम आपल्या नावे केले. पहिला विक्रम म्हणजे मागील ५५ वर्षांत भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने पहिल्यांदाच झेंडा फडकवला. त्यासोबतच अभिजीत वंजारी यांनी मतांचाही विक्रम नोंदवला आहे. मतांच्या बाबतीत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही मागे टाकलं आहे.

अभिजीत वंजारी यांनी ५५ वर्षांपासूनचा भाजपाचा गड असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघ काबीज केला. त्यांनी भाजपाचे उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. अभिजीत वंजारी यांना पदवीधर निवडणुकीत ५५ हजार ९४७ मतं मिळाली. त्यांना मिळालेली मतं मागील १८ वर्षातील सर्वाधिक मतं आहेत.

२००८मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये सध्या केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी यांना ५२ हजार ७६१ मतं मिळाली होती. मात्र, यंदा अभिजीत वंजारी यांनी प्रथम पसंतीमध्ये ५५ हजार ९४७ मतं मिळवली आहेत. ही मतं गेल्या १८ वर्षातील सर्वाधिक मतं आहेत. २०१४ मध्ये भाजपाचे अनिल सोले यांना ५२ हजार ४८४ मतं पडली होती. त्या निवडणुकीत सोले विजयी झाले होते.

भाजपाचा बालेकिल्ला काबीज करणारे वंजारी कोण आहेत?

अभिजीत वंजारी हे नागपूर पदवीधर मतदार संघातून विजयी झाले आहेत. वंजारी हे नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर महाविकास आघाडीतर्फे रिंगणात उतरले होते. वंजारी हे विदर्भातील काँग्रेसचे निष्ठावान नेते समजले जातात. वंजारी यांची नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आधीपासूनच तयारी होती. उमेदवारीच्या शर्यतीत वंजारी अग्रेसर होते, त्याचबरोबर मार्चपासूनच ते मतदारांशी संपर्क करण्याच्या कामाला लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.