कोविडची लक्षणे असली तरी मतदान करा!

Mlc Elections Voters With Covid 19 Symptoms Can Vote In The Last Hour

MLC Elections राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात १ लाख ८८ हजार मतदारांची नोंदणी झाली असून त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.

नागपूर: विधानपरिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. मात्र अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी कोविडच्या दृष्टीकोनातून काळजी घेतली जाणार आहे. मतदानाला आलेल्या एखाद्या मतदाराला ऐनवेळी कोविड सदृष्य लक्षणे आढळल्यास त्याच्यासाठी शेवटच्या तासात मतदानाची सोय केली जाणार आहे. तसेच अधिक गर्दी टाळण्यासाठी एक हजार मतदारांमागे एका मतदान केंद्राची सोय केली जाणार आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना विभागीय आयुक्त  डॉ . संजय कुमार म्हणाले, यंदाची निवडणूक ही करोनाची साथ सुरू असताना होत आहे. त्यामुळे अन्य प्रशासकीय बाबींखेरीज कोविडच्या दृष्टीकोणातून आवश्यक ती काळजी घेतली जाणार आहे. मतदान केंद्रांसाठी तसेच मतमोजणीसाठी मोठी जागा पुरविली जाईल. गरज पडल्यास अधिक मतदान केंद्रांची सोय केली जाईल. केंद्रांवर सॅनिटायजर, थर्मल तपासणीची सुविधा असेल. मतदारांना सार्वजनिक वावराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. ज्या मतदारांना  करोना संसर्गाची बाधा झाली आहे व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अथवा ते गृह विलगीकरणात आहेत अशा रुग्णांसाठी पोस्टल मतदानाची सुविधा आहे. तसेच मतदानाला आलेल्या एखाद्या मतदाराला ऐनवेळी कोविडसदृष्य लक्षणे आढळल्यास त्याला मतदानाच्या शेवटच्या तासात मतदानाची सोय करून दिली जाणार आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे  , उपायुक्त मिलींद साळवे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे आदी अधिकारी उपस्थित होते.

अर्ज भरताना दोन गाड्या

अर्ज सादर करताना उमेदवारासोबत केवळ दोनच व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. तसेच अर्ज दाखल करण्यासाठीच्या परिसरात उमेदवाराच्या केवळ दोनच गाड्यांना प्रवेश दिला जाईल.

मतदारांसाठी हातमोजे

या निवडणुकीत अद्याप १ लाख ८८ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. करोनाच्या दृष्टीकोनातून काळजी घेण्याच्या उद्देशाने मतदान केंद्रांवर प्रत्येक मतदाराला डिस्पोझेबल मास्क आणि हातमोजे पुरविण्याचीही सुविधा प्रशासनातर्फे केली जाणार आहे.

वेळापत्रक

उमेदवारी अर्ज सादर करण्याची तारीख: १२ नोव्हेंबर
उर्ज मागे घेण्याची मुदत: १७ नोव्हेंबर
मतदान: १ डिसेंबर, सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
मतमोजणी: ३ डिसेंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.