महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण

मुंबई, ९ जुलै : बंगालचा उपसागर आणि ओडिशा, पश्चिम बंगालच्या समुद्र किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे बळीराजाला आणि पर्यायाने पिकांसाठी पुन्हा एकदा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे.

पाण्यासह दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकेल

पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, गोवा, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकेल.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

दरम्यान ९ जुलै रोजी सिंधुदुर्ग, १० जुलै रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर ११ जुलै रोजी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.