शिवसेना खासदार अरविंद सावंतांविरोधात खासदार राणांची तक्रार

Share This News

नवी दिल्ली/अमरावती : सचिन वाझे प्रकरणावर लोकसभेत बोलण्याबाबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी धमकाविल्याची तक्रार अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे.
खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर सावंत यांनी खुलासा करत आरोप फेटाळून लावला. राणा या मुद्द्यावर आक्रमक झाल्या आहेत. सावंत यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी धमकावल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती.
‘तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू’, अशा शब्दात सावंत यांनी धमकाविल्याचे राणा यांनी म्हटले आहे. हे आरोप फेटाळताना सावंत म्हणाले, ‘हे खोटे आहे. त्या मला येता जाता भय्या-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. पण, त्यांना धमकावले हे साफ खोटे आहे. उलट त्याच सगळ्यांना धमकावत असतात. तुम्ही बघितले तर त्या सभागृहात महाराष्ट्र सरकारविषयी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून तुम्हाला दिसेल की त्या खूप द्वेष करतात. तिरस्कार करतात. मी आयुष्यात कधीही कुणाला धमकावले नाही. महिलांना धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. महिलांना धमकावेल का?


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.