महावितरणची वीज सर्वात महाग

शेतकऱ्यांचा भार अन्य ग्राहकांवर

मुंबईच्या काही भागातील ग्राहकांना अदानी, बेस्ट, टाटा पॉवर या तीन खासगी वीज वितरण कंपन्यांकडून तर राज्यातील इतर भागात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. चारही कंपन्यांच्या देयकांची तुलना केल्यास महावितरणची वीज सर्वात महाग असून बेस्टच्या ५०० युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांना सर्वात स्वस्त वीज मिळत आहे.  ७०० युनिटहून अधिक वापर असलेल्यांना अदानीचीही वीज स्वस्त पडत आहे.

राज्यात सर्वाधिक २ कोटी ७३ लाख ३१ हजारांहून अधिक महावितरणचे ग्राहक आहेत.  महावितरणच्या ग्राहकांमध्ये कृषी संवर्गातील ४२ लाख ५८ हजार ३५१ ग्राहक, निवासी संवर्गातील २ कोटी ४ लाख ५५ हजार २८१ ग्राहक, व्यावसायिक संवर्गातील १९ लाख ५६ हजार ६४ ग्राहक, औद्योगिक संवर्गातील ३ लाख १४ हजार ४६६ ग्राहक, इतर संवर्गातील ३ लाख ४७ हजार ५६३ ग्राहकांचा समावेश आहे. दरम्यान राज्यात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध केली जात असून ते सर्व महावितरणचे ग्राहक आहेत.

शेतकऱ्यांवरील विजेचा अतिरिक्त भार काही प्रमाणात शासनावर तर उर्वरित भार इतर ग्राहकांवर टाकला जातो. वीज तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, शासनाकडून आकारले जाणारे १६ टक्के वीज शुल्क आणि वीज विक्री कर वगळून राज्यात ३० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांकडून महावितरण २४७.३० रुपये, अदानी २०४.१० रुपये, बेस्ट १६५.४० रुपये, टाटा पॉवर १८३.१० रुपये वीज देयक आकारते. १०० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांकडून महावितरण ५९१ रुपये, अदानी ५१७, बेस्ट ३८८, टाटा पॉवर ४४७ रुपये आकारते. ५०० युनिट वापर असलेल्या ग्राहकांकडून महावितरण ४,७२१ रुपये, अदानी ३,४८५ रु., बेस्ट ३,३२८ रु., टाटा पॉवर ३,६४५ रूपये आकारते. १००० युनिट वापर असलेल्यांकडून महावितरण ११,३०१ रुपये, अदानी ८,१९५ रु., बेस्ट ८,४८३ रु., टाटा पॉवर ८,८५५ रूपये आकारते.

अतिरिक्त ३.३३ रुपये आकारणी

महानिर्मितीसह इतर खासगी वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी महावितरणला प्रती युनिट ७.३१ रुपयांचा खर्च येतो. त्यानंतरही शेतकऱ्यांना ३.९८ रुपये प्रती युनिट दराने वीज दिली जाते. त्यातीलही १.७८ रुपये प्रती युनिट सवलतीचा भार शासन  उचलते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती युनिट केवळ २.२० रुपये प्रती युनिट दराने वीज  मिळते.  उर्वरित ३.३३ रुपयांचा भार इतर विविध वर्गातील ग्राहकांकडून  घेतला जातो.

शेतकऱ्यांच्या उत्पादनातून संपूर्ण राज्याची भूक भागते. त्यामुळे इतरही कंपन्यांतील ग्राहकांवर शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात अधिभार लावत महावितरणच्या ग्राहकांवरील भार कमी करायला हवा. असे झाल्यास महावितरणच्या ग्राहकांनाही स्वस्त वीज मिळेल.

– महेंद्र जिचकार, वीज क्षेत्राचे जाणकार, नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.