खंडणी मागणाऱ्या मुंबई महापालिकेच्या चौघा क्लीन-अप मार्शलना बेड्या

Share This News

मुंबई, १६ मे : कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून खंडणीच्या स्वरुपात पैशांची मागणी करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या चौघा क्लीन-अप मार्शलना अटक करण्यात आली. दीड लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईत एमआयडीसी पोलिसांनी या चौघा क्लीन-अप मार्शलना अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असताना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. दररोज लाखो रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने क्लीन-अप मार्शलची नेमणूक मुंबईतील प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. मात्र, हे क्लीन-अप मार्शल खंडणीच्या स्वरुपात पैशांची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.अंधेरीतील एमआयडीसी परिसरातील एका कंपनी मालकाकडून या क्लीन अप मार्शलनी मास्क न घातल्याप्रकरणी आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दीड लाख रुपयांची खंडणी मागितली होती. कंपनी मालकाने 21 एप्रिल रोजी दीड लाखांऐवजी 20 हजार रुपयांची खंडणी दिली होती. मात्र, आरोपीने काल संध्याकाळी पुन्हा त्याच कंपनीमध्ये छापा मारुन एक लाखांची खंडणी मागितली. यानंतर कंपनी मालकाने या क्लीनअप मार्शलच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी 5 क्लीन-अप मार्शलच्या विरोधात गुन्हा नोंद करुन चौघा क्लीन-अप मार्शलना अटक केली आहे.एमआयडीसी पोलिसांनी प्रमोद माने, विशाल सूर्यवंशी, दादासाहेब गोडसे, आकाश गायकवाड या चौघा आरोपींचा अटक केली असून यातील एक आरोपी पसार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.