अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यात हात असेल तर आमचा हात’; चंद्रकांत पाटलांनी राऊतांना सुनावले

मुंबई : शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात भाजपाचा हात असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत चांगलेच सुनावले आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना पाटील म्हणाले, ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या सर्व संघटना बरखास्त झाल्या आणि सर्व नेतृत्व भाजपाकडे आले. त्यावर असह्य होऊन अवघड स्थिती झाल्याने संजय राऊत वारंवार यात भाजपाचा हात असल्याचे म्हणत आहेत. कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यात हात असेल तर आमचा हात आहे. आम्ही तो काही अमान्य करत नाही.’
‘एसटी कर्मचाऱ्यांची खूप भीषण स्थिती आहे. या बैठकीत आपल्याला या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर काय करायचे याचाही निर्णय करावा लागणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा म्हणून आपण ठिकठिकाणी रस्त्यावर उतरलो. असे पाटील म्हणाले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या युनियन लिडरवर विश्वास नाही. त्यांनी कर्मचाऱ्यांना फसवले आहे. आपले दोन नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर गेल्या आठवडाभर एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांवर टीका करताना पाटील म्हणाले, ‘सदाभाऊ खोत वाढलेली दाढी घेऊन आले तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले का? एसटी कर्मचाऱ्यांच्या गावागावातून मागण्या आहेत की गोपीचंद पडळकरांना पाठवा, सदाभाऊ खोतांना पाठवा. ते त्यांच्या कुठल्याही युनियन लिडरचे नाव घ्यायला तयार नाही. कारण त्यांना सर्वांनी फसवले आहे.’

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.