काँग्रेस खोटे बोलणे कधी बंद करणार ? जे.पी. नड्डा

नवी दिल्ली, 19 जानेवारी : अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनने गाव वसवल्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेला भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेय. चीनवरून काँग्रेस खोटे बोलणे केव्हा बंद करणार, असा सवाल नड्डा यांनी केलाय. यासंदर्भात नड्डा यांनी एकामागून एक ट्विट करत, काँग्रेसवर टीका केलीय. आपल्या ट्वीटमध्ये नड्डा म्हणाले की, राहुल गांधी महिन्याभराच्या सुट्टीवरून आता परत आले आहेत. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. राहुल गांधी या प्रश्नांची उत्तरे देतील, अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी, गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस चीनवरून खोटे बोलणे केव्हा थांबवणार, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अरुणाचल प्रदेशसह हजारो किलोमीटरची जमीन चीनला भेट म्हणून दिली, ही बाब काँग्रेस नाकारणार का, अशी विचारणा जेपी नड्डा यांनी केली आहे.काँग्रेस वारंवार चीनसमोर गुघडे का टेकते, असा सवाल करत राहुल गांधींचा चीन आणि कम्युनिस्ट पक्षाशी केलेले करार रद्द करण्याचा काय विचार आहे का, चीनकडून ट्रस्टसाठी मिळालेल्या देणग्या परत करणार का, असे खरमरीत सवाल जेपी नड्डा यांनी विचारले.तसेच राहुल गांधी यांनी कोरोना विरोधातील लढाई सुरू असताना देशाला कमीपणा दाखवण्याची एकही संधी सोडली नाही. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करून लस शोधून काढली. राहुल गांधी यांनी शास्त्रज्ञांचे एकदाही अभिनंदन किंवा कौतुक केले नाही, अशी टीका जेपी नड्डा यांनी केली. कृषी कायद्याविरोधा शेतकऱ्यांना भडकवणे आणि गैरसमज पसरवणे केव्हा थांबवणार ? एपीएमसी सर्व मंडया बंद करणार असल्याचे सांगत राहुल गांधी खोटी माहिती पसरवत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींवर काँग्रेस सरकारने अंमलबजावणी का केली नाही. विरोधी बाकांवर असतानाच काँग्रेसला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती का वाटते, काँग्रेस सत्तेत असताना शेतकऱ्यांची प्रगती का झाली नाही, असा सवालही नड्डा यांनी उपस्थित केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.