नागपूर : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांकरिता पाच सदस्यीय समिती होणार गठीत

नागपूर : केंद्र व राज्य शासनाकडून जनहिताच्या विविध योजना लागू करण्यात येतात. या योजना शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अंमलात आणण्याची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची आहे. या योजनांकरिता प्राप्त होणारा निधी व त्यासाठी आवश्यक पाठपुरावा, निधीचे नियोजन योग्यरित्या व्हावे व त्यातून या योजना शेवटच्या घटकापर्यंत राबविणे यशस्वी यासाठी मनपामध्ये पाच सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय मनपाच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. महापौर दयाशंकर तिवारी यांनी नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या प्रश्नावर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर यासंबंधी प्रशासनाला निर्देश दिले.
एनयूएचएम व एनयूएलएम अशा पद्धतीच्या राष्ट्रीय व राज्यातील आणखी कोणकोणत्या योजना नागपूर महागरपालिकेतर्फे राबविण्यात येतात, यासंबंधी नगरसेवक ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी सभागृहात प्रश्न मांडला. यावर प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या उत्तरावर ज्येष्ठ नगरसेवक विजय (पिंटू) झलके यांनी २००८ ते २०२१ पर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या संदर्भात मनपाकडे किती निधी उपलब्ध झाला, असा उपप्रश्न केला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची योग्य अंमलबजावणी व्हावी व पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा याकरिता मनपामध्ये विशेष समित्यांप्रमाणेच एक समिती असावी अशी सूचना ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली. यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी संपूर्ण विषयाच्या अनुषंगाने आयुक्तांनी यामध्ये विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. मनपामध्ये गठीत विशेष समित्यांद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र समितीतील पदाधिका-यांनाही योजनांविषयी माहिती राहत नसल्याने प्रशासनाद्वारे ही माहिती पुरविण्याची कार्यवाही करण्यात यावी. त्याअनुषंगाने ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी संपूर्ण विषयांची मनपा आयुक्तांना माहिती देउन मनपा आयुक्तांनी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असेही निर्देश महापौरांनी दिले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.