नागपूर : अंबाझरीचे पाणी दूषित होऊ नये

नागपूर
हिंगणा औद्योगिक क्षेत्रासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी अंबाझरी तलावाच्या पाण्याचा वापर होत असून तलावातील पाणी प्रदूषित होणार नाही यासाठी वाडी तसेच औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुध्दीकरण संयंत्र तात्काळ कार्यान्वित करा, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.

बचत भवन सभागृहात जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी बी.ए. यादव, कोशियाचे झुल्पेश शहा, सचिन जैन, प्रविण अंबासेलकर, आर. एस. तिडके, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार आदींसह विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हिंगणा, बुटीबोरी, भिवापूर, कळमेश्‍वर येथील उद्योजक तसेच विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशन, बुटीबोरी व हिंगणा मॅनिफॅरिंग असोसिएशनचे पदाधिकारी तसेच लघु उद्योग कोशिया संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वाडी तसेच हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी अंबाझरी तलावात सोडल्या जात असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण व दुगर्ंधी येत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन अंबाझरी तलावजवळील नाल्यावर एसटीपीयंत्र बसविण्यासंदर्भात वाडी नगरपंचायतीने तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देतानाच महानगरपालिकेतर्फे एसटीपी बसविण्याचे काम सुरू केले असून हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिल्या.

हिंगणा औद्योगिक क्षेत्रात खुल्या जागांवर मोठय़ा प्रमाणात कचरा टाकल्या जात असल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज वीसटन कचरा गोळा करण्यासाठी तसेच कचर्‍याची विल्हेवाट करण्यासाठी जिल्हा परिषदेने जागेचा शोध घेवून विलगिकरणाचे काम सुरु करावे. तत्पूर्वी औद्योगिक विकास मंडळाने तत्काळ कचरा उचलण्याची कारवाई सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले. एमआयडीसीमधून वाडीकडे जाणारी वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे संरक्षण विभागाच्या जागेचे अधिग्रहन करून बायपास तयार करण्याबाबतही बैठकीत सांगण्यात आले. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील ड्रेनेज लाईन परिसराची स्वच्छता, उद्योजकांना दैनंदिन आवश्यक सुविधा तसेच उद्योजकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिल्यात. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय सुरू होत असून त्याच धर्तीवर हिंगणा औद्योगिक क्षेत्रातही कामगारांना आरोग्य सुविधा मिळण्यासंदर्भात उद्योगजकांनी सूचना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.