नागपूर : शहरात कोरोना पाय पसरतोय!

नागपूर
एकीकडे ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार झाल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे शहरात कोरोना पुन्हा झपाट्याने पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे. रविवार (ता. ५) रोजी एकट्या नागपूर शहरातच १0 बाधितांची नोंद झाली असून, ग्रामीण भागात सलग तिसर्‍याही दिवशी एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. तर दिवसभरात ५ जण बरे होऊन घरी परतले असून, एकाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.
रविवारला शहरात ३५३१ व ग्रामीणमध्ये ८७१ अशा जिल्ह्यात ४४0२ चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी ग्रामीणमधून सलग तिसर्‍याही दिवशी एकही बाधित आढळून आलेला नसनू, एकट्या शहरातून १0 नव्या बाधितांची भर पडली आहे. शहरात दिवसाआड रुग्णसंख्येमध्ये होत चाललेली वाढ ही प्रशासनाच्या सोबतच नागपूरकरांची चिंता वाढविणारी बाब ठरत चालली आहे. तर आज दिवसभरात शहरातून ५ जण ठणठणीत होऊन आपल्या घरी परतल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या ४.८२ लाख ८९४ वर गेली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९४ टक्क्यांवर स्थिरावले आहे. आज एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली नसून, बाधितांचे प्रमाण वाढताच सक्रिय रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. आजघडीला शहरात ४२ व ग्रामीणमध्ये ५ असे ४७ सक्रिय (अँक्टिव्ह) रुग्ण असून, सर्वच जण मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालयांसोबतच कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.