उपायुक्तांना पदावनत करण्यात येत असल्याची मनपात जोरदार चर्चा

Share This News

Nagpur Deputy Commissioner Will Be Demoted During Tukaram Mundhe’s

मनपाचे तत्कालीन आयुक्त  तुकाराम मुंढे यांनी ऐन करोनाच्या काळात मनपाच्या प्रशासनात अनेक बदल केले. प्रशासनिक पातळीवर बदल करताना काही नवे पद निर्माण करून जबाबदाऱ्यांचे वाटपही करण्यात आले. याच जबाबदारीत मनपातील काहींना उपायुक्त पद देण्यात आले. कनिष्ठ असतानाही हे पद देण्यात आल्याने अनेक वरिष्ठांमध्ये नाराजी पसरली होती. आता यातील काही उपायुक्तांना पदावनत करण्यात येत असल्याची मनपात जोरदार चर्चा आहे.

मनपाच तत्कालीन आयुक्त मुंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रशासनिक पातळीवर सुधार करण्याचे जाहीर केले होते.   मुंबई महानगरपालिका कायदा लागू होण्यापूर्वी नागपूर मनपात सीपी अॅण्ड बेरार कायदा लागू होता. याच कायद्यान्वये मनपात अनेक विभागातील कार्यप्रणाली होती. यात बदल करून जबाबदारी व अधिकाराचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात कर विभागात सर्वात मोठा बदल करण्यात आला. करप्रणाली अधिक सोपी व सुरळीत करण्यासाठी झोन स्तरावर त्यावेळी बदल करण्याचे व मुल्यांकनाच्या अधिकाराची व्याख्या केली होती. यातून मनपाचा उत्पन्नातील वाटा वाढून कामचुकार व मनपाचे नुकसान करणारे अलगद अडकले जातील, अशी रचनाही केली. त्यातील पुढील टप्प्यात सत्तरहून अधिक अभियंत्यांच्या बदल्याही केल्या होत्या.

गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या अनेक अभियंत्यांना बदलण्यात आले. त्यांचे विभाग बदलले. कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या मुळ विभागात परत पाठविण्यात आले होते. उपअभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आदींच्याही झोनस्तरावर मोठ्या बदल्या करण्यात आल्या होत्या. याच मालिकेत करोना शहरात वेगाने पसरत असल्याने काहींना उपायुक्त म्हणून पदभार देण्यात आला. हा तात्पुरत्या स्वरूपातील पदभार होता. मात्र, यातून अनेक अधिकाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना व नाराजी मनपात पसरली होती. मात्र, बोलायची कुठलीही संधी नसल्याने अनेकांनी हा बदल मान्य केला. आता मनपातील प्रशासनिक पातळीवर बराचसा बदल झाला असल्याने, केवळ पदभार देवून पदोन्नत करण्यात आलेल्यांना पुन्हा पदावनत करण्यात येत असल्याची माहिती आहे. काही कनिष्ठ असतानाही त्यांना उपायुक्तांचा पदभार देण्यात आला होता. माहितीनुसार, यातील एक उपायुक्त पुन्हा पदावनत करण्यात येत असल्याने नाराज असून, यामुळे अनेकदा रजा घेत असल्याची माहिती आहे. मुंढे यांच्या काळात प्रकाश उराडे, मिलिंद मेश्राम, महेश मोरोणे, डॉ. प्रदीप दासरवार आणि अमोल चोरपगार आदींना उपायुक्त पदाचा दर्जा देण्यात आला होता.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.