नवीन कोरोना नष्ट करण्यासाठी नागपूर मनपा सज्ज

नागपूर : नवीन कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली. तसेच, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे. नवीन कोरोना विषाणूने लंडन व युरोपातील इतर देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. केंद्र सरकारने ३० डिसेंबरपर्यंत लंडनला जाणारी व तेथून येणारी विमाने रद्द केली आहेत. तसेच, राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्वारंटाईन राहणे बंधनकारक केले आहे. नागपुरात येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसाकरिता इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये पाठवले जाणार आहे, असे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. लंडन येथून नागपुरात आलेल्या नवीन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील सर्व लोकांची चाचणी करण्यात आली आहे.

त्यापैकी काहीजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहीरवार यांनी नवीन कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मेडिकलमध्ये भरती केले जाईल. तसेच, व्हीएनआयटी येथे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. २० दिवसांपूर्वी लंडनवरून आलेल्या व्यक्तींचा झोननिहाय शोध घेतला जात आहे, असे त्यांनी सांगितले. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, नवीन कोरोना विषाणू नुकताच आढळल्यामुळे सध्या त्याच्याविषयी अधिक बोलता येणार नाही. परंतु, नवीन विषाणू जास्त लोकांना संक्रमित करणारा असल्याचे व तो आधीच्या पेक्षा ७० टक्के जास्त पसरत असल्याचे बोलले जात आहे. त्यावर शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू आहे. जुन्या कोरोनावरील लस प्रभावी ठरल्यास ती नवीन कोरोनाविरुद्ध लढण्यासही उपयोगी सिद्ध होऊ शकते. नवीन कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

तज्ज्ञांनुसार, नवीन कोरोनामध्ये झपाट्याने वाढण्याची क्षमता आहे. त्यामुळे याकरिता स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. परिणामी, इतर रुग्ण व आरोग्य सेवकांना नवीन कोरोनाची लागण होणार नाही. नवीन कोरोनामुळे अद्याप कुणाचा मृत्यू झाला नाही, ही एक समाधानाची बाब आहे. आवश्यक काळजी घेतल्यास नवीन कोरोना विषाणूपासून स्वत:ला सुरक्षित ठेवता येऊ शकते, याकडे डॉ. गावंडे यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.