नागपूर : रोजगार हमी योजनेतून ‘बहरतेय’ जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या फळबागा

मनरेगा फळबाग लागवड योजनेकडे शेतकर्‍यांचा कल आता वाढतो आहे. पारंपरिक पिकांसोबतच शेतावर अथवा शेतीच्या बांधावर शेतकरी फळबागेची लागवड करीत आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या योजनेअंतर्गत जवळपास तिप्पट लागवड झाली आहे. सदर योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योजनेत सहभागी होऊन फळबाग लागवड करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे.जिल्ह्यात आजवर झालेली फळबागेची लागवड
पीक एकूण क्षेत्र (हेक्टरमध्ये)

आंबा ६.८
संत्रा ४२५.९१
मोसंबी १५६.३0
पेरू ३
सीताफळ ४७.७५
का. लिंबू २१.६0
शेवगा १
साग 0.७0
एकूण ६६३.४६तुषार पिल्लेवान


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकडे आता जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा कल वाढताना दिसून येत आहे. पारंपरिक शेती पिकांसोबतच फळबाग लागवड करून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत. सदर योजनेअंतर्गत यंदाच्या वर्षी जिल्ह्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग नोंदवून मोठय़ा प्रमाणात लागवड केली आहे.
मनरेगा ही १00 टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून, राज्यात २0११-१२ पासून ही सुरू करण्यात आली आहे. वैयक्तिक लाभार्थीच्या शेतावर कृषी विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शंभर टक्के अनुदानावर ही योजना आहे. फळबाग लागवड कार्यक्रमामुळे लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन सहभागी लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. गतवर्षी नागपूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत केवळ २२१.३ हेक्टरवरच लागवड झाली होती. यंदा २0२0-२१ मध्ये या योजनेअंतर्गत आजवर शेतकर्‍यांनी ६६३.४५ हेक्टरवर लागवड केली आहे. योजनेसाठी जिल्ह्यातील ३९१ गावातील १२४८ शेतकर्‍यांची निवड केल्या गेली. त्यापैकी ११८२ शेतकर्‍यांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. पैकी आजवर ७८९ शेतकर्‍यांनी वैयक्तिक शेतावर तर काहींनी वैयक्तिक शेतीच्या बांधावर अशी जवळपास २ लाख १ हजार ७६५ वर फळपिकांच्या वृक्षांची लागवड केली आहे. आजवर योजनेवर २९.१६ लाखांवर खर्च करण्यात आला आहे. योजनेसाठी तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार तालुका कृषी अधिकारी, प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांना आहे. फळबाग लागवड कार्यक्रमासाठी लाभार्थींचे नाव असलेले मनरेगा योजनेचे जॉब कार्ड, शेतीचा ७/१२, ८-अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ग्रामसभेतून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
या योजनेमध्ये आहे या फळांचा समावेश
या योजनेत आंबा कलम, आंबा रोपे, चिकू, पेरू, डाळिंब, मोसंबी, संत्रा, लिंबू आदी कलम व रोपे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. फळपिकांचा समावेश करून शेतकर्‍यांच्या मागणीनुसार घनपद्धतीने लागवडीकरिता तसेच कलमे रोपे लागवडीचे प्रती हेक्टरी सुधारित मापदंडास शासनाने मान्यता दिली आहे. या पिकांच्या लागवड, रोपे खरेदी, मजुरी, सामुग्रीकरिता तिसर्‍या वर्षापर्यंत अनुदान देण्यात येते.
अशी होते लाभार्थींची निवड
वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय़रेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, स्रियांकरिता असलेली कुटुंबे, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य असलेले) अधिनियम, २00६ खालील लाभार्थी आणि उपरोक्त प्रवर्गातील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्या नंतर कृषी कर्जमाफी व कर्जसाहाय्य योजना, २00८ यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमांत भूधारक शेतकर्‍यांच्या जमिनीवरील कामांना, शर्तीच्या अधिनतेने प्राधान्य देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.