नागपूर : महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित

गांधीबागेत डागा हॉस्पिटल रस्त्यावर लाल इमली चौक ते टांगा स्टँड चौकापर्यंत रस्त्याला लागून ११ केव्ही विद्युत केबलचे रोपण करण्यात आले आहे. या मार्गाचे नुकतेच सिमेंटीकरणही झाले आहे. त्याचमुळे रविवारी संध्याकाळी कंत्राटदाराने गांधीबागेत रस्त्याला लागून गट्टू लावण्यासाठी खोदकाम सुरू केले होते. खोदकामादरम्यान नंगा पुतळ्याजवळ अचानक मोठा स्पार्क झाला. या घटनेने प्रचंड खळबळही माजली होती. त्यानंतर बरेच तास विद्युत पुरवठा प्रभावित झाला होता. या प्रकाराने परिसरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी खोदकाम करणाऱ्या कंत्राटदारावर ढकलण्यात आली होती. मात्र, रस्त्याला लागून गट्टू लावण्यासाठी करण्यात आलेले खोदकाम केवळ आठ इंचांचे आहे. एवढ्या कमी इंचांच्या खोदकामानंतर विद्युत केबल बाहेर आले, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे आता फासा महावितरणच्या कंत्राटदाराकडे वळला आहे. त्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे.महावितरण कंत्राटदाराच्या दुर्बुद्धीने गांधीबागेत भयंकर अपघाताची धास्ती वाढली आहे. परिसरातील रस्त्याच्या कडेला केवळ आठ इंचांचे खोदकाम करून तयार केलेल्या नालीत ११ केव्ही विद्युततारेचे रोपण करण्यात आले आहे. कंत्राटदाराच्या या अतिशहाणपणाचा धोका मात्र नागरिकांच्या जीविताला निर्माण झाला आहे. मात्र, या कामाचे निरीक्षण करण्याची तसदी महावितरणने घेतलेली नाही. ‘लोकमत’च्या चमूने या कामाचे निरीक्षण केले असता स्थिती चिंताजनक होती. केबलरोपणासाठी केलेले खोदकाम उथळ असल्याने तेथून पायपीट करणाऱ्या नागरिकांना विद्युत धक्का लागणे, वाहनांच्या वाहतुकीने आणि लोड वाढल्याने मोठा स्पार्क, आदी घटना भयावह ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.