पंधरा दिवसांत सिलेंडर शंभर रुपयांनी महागल्याने नागपूरकर संतप्त

नागपूर : गेल्या पंधरा दिवसात घरगुती सिलेंडरचे दर थेट शंभर रुपयांनी वाढल्याने नागपूरकरांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सिलेंडर विक्री केंद्रावर नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.

आधीच करोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे.  अनेक हॉटेल, प्रतिष्ठाने कायमची बंद झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. अशात थेट शंभर रुपयांनी १४ किलोच्या घरगुती सिलेंडरचे दर वाढले आहेत. ३० नोव्हेंबर रोजी घरगुती सिलेंडरचे दर ६५० रुपये होते. मात्र लगेच १ डिसेंबरला पन्नास रुपये  दरवाढ करण्यात आली. त्यामुळे सिलेंडर थेट ७०० रुपयांवर गेले. पंधरा दिवस उलटत नाही तर पुन्हा १५ डिसेंबर रोजी ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली. त्यामुळे आता प्रतिसिलेंडर थेट ७५० रुपयांवर गेले आहे. दुसरीकडे व्यावसायिक सिलेंडरचेही दर याच महिन्यात थेट शंभर रुपयांनी वाढले आहेत.

आधी हे व्यावसायिक सिलेंडर १ हजार ३५० रुपये दराने मिळत होते. आता १ हजार ४५० रुपये मोजावे लागत आहेत. याचा थेट फटका हॉटेलचालकांना बसत असल्याने त्यांच्याकडूनही रोष व्यक्त केला जात आहे. आधी अनुदान बंद केले आणि आता टप्प्याटप्प्याने दरवाढ करत असल्याने  केंद्र सरकारचा निषेध  केला जात आहे.

दर तफावतीमुळे नियमाला हरताळ

शहरातील विविध सिलेंडर विक्रेत्यांच्या दरात तफावत दिसून येत आहे. पांडे लेआऊट, खामला भागात प्रती एक सिलेंडर ७६० रुपयांना दिले जात असून कोणतीचा पावती दिली जात नाही.  शांतीनगर येथे ७५० रुपये दराने सिलेंडर मिळत आहे. विशेष म्हणजे, विना ओटीपी सिलेंडरचे वितरण होत असल्याने सिलेंडर विक्रेतेच सरकारच्या नियमाला हरताळ फासत आहेत.

हे तर केंद्र सरकारचे अपयश

एकाच महिन्यात थेट शंभर रुपये सिलेंडरची दरवाढ  सर्वसामान्यांना परवडणारी नाही. करोनाकाळात सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा असताना अशाप्रकारची दरवाढ केल्याने केंद्र सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आधी अनुदान बंद केले आणि आता दरवाढ करत आहेत. दर नियंत्रणात ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची असून त्यात ते अपयशी ठरल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

– नूतन रेवतकर , गृहिणी.

असे वाढले दर..

*   ३० नोव्हेंबर – ६५०

*   १ डिसेंबर –  ७००

*   १६ डिसेंबर – ७५०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.