स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये नागपूरची ४४ व्या स्थानावर घसरण

नागपूर
केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणार्‍या कामांचे रँकिंग करण्यात येते. यात नागपूर शहर माघारले असून, शहराची ४४ व्या स्थानावर घसरण झाली आहे. पुणे, नाशिक, ठाणे, पिंपरी चिंचवडच्याही मागे शहराची पिछेहाट झाली आहे. दरम्यान, यापूर्वी कागदोपत्री मूल्यांकनात नागपूर टॉपवर असल्याचे सांगण्यात येत होते. वास्तविकतेत केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत आरसा दाखविण्यात आला आहे.

भरतवाडा, पारडी, पुनापूर या भागातील १७३0 एकर परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्प उभारला जात आहे. ६५0 कोटींचा हा प्रकल्प आहे. होम स्वीट होम हा २२0 कोटींचा प्रकल्प आहे. यापूर्वी नागपूर शहर स्मार्ट सिटी प्रकल्पात आघाडीवर होते. मागील वर्षी मार्च महिन्यात देशातील १00 शहरात नागपूर टॉपवर होते. यानंतर शहराचा क्रमांक घसरून दुसर्‍या क्रमांकावर गेला. यानंतर मे महिन्यात शहराची घसरण थेट ८ व्या क्रमांकावर झाली. आता जानेवारी २0२१ मध्ये नागपूर तब्बल ४४ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. स्मार्ट सिटी रँकिंगकरिता विविध प्रकारचे निकष गृहित धरले जातात. स्मार्ट सिटी प्रकल्पावरील खर्च, प्रकल्पाची प्रगती, कार्यादेश, निविदा प्रक्रिया, प्राप्त निधीचा खर्च, महापालिकेचा परफॉर्मन्स आदींचा यात समावेश असतो. तुकाराम मुंढे हे मनपा आयुक्त असताना स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली होती. ते आले तेव्हा शहर स्मार्ट सिटी प्रकल्पात २८ व्या स्थानावर होते. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात रँकिंग हे २३ वर आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.