काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनातील नागपूरकर शिलेदार ‘अनामिक’

नागपूर : २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर १९२०. तत्कालीन सेंट्रल प्रोव्हिन्सचे मुख्य शहर असणारे नागपूर शहर देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला मिळालेली नवी दिशा अन् क्रांतिकारी नेत्यांच्या जाज्वल्य वक्तृत्वाचे साक्षीदार झाले. नागपूरसह विदर्भातील काँग्रेसचे अनेक शिलेदार दिवस-रात्र मेहनत करून या ‘न भूतो न भविष्यति’ अधिवेशनासाठी झटले होते. १०० वर्षांपूर्वी १४ हजाराहून अधिक सदस्यांच्या उपस्थितीचे शिवधनुष्य नियोजनातून पेलले होते. अगदी तत्कालीन अध्यक्ष मात्र इतिहासाची पाने उलटून एक शतक लोटल्यानंतर त्या महान शिलेदारांचा राजकीय पक्ष तर सोडाच, नागपूरकरांनादेखील विसर पडला आहे. महत्प्रयासाने नागपूरला अधिवेशनाच्या आयोजनाचा मान मिळाला होता. त्याकाळी नागपूरसह सेंट्रल प्रोव्हिन्समधील अनेक मंडळींचे काँग्रेसमध्ये वजन होते. स्वागत समितीच्या अध्यक्षपदाची धुरा जमनालाल बजाज यांच्याकडे तर सरचिटणीस म्हणून डॉ. बाळकृष्ण मुंजे यांच्याकडे जबाबदारी होती. या अधिवेशनाला १४ हजार ५८२ प्रतिनिधी देशभरातून उपस्थित राहतील, असे निश्चित झाले होते. काँग्रेसनगर व धंतोलीच्या परिसरात १० हजाराहून अधिक खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. ही सर्व व्यवस्था करणे ही तारेवरची कसरत होती. मात्र नागपूरकर मंडळींना सोबत घेऊन बजाज व मुंजे यांनी योग्य नियोजन केले होते. आयोजकांनी त्या काळी १ लाख ५ हजार ४६४ रुपये ३ आणे जमा केले होते. काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनासाठी झटलेले अनेक जण पुढेदेखील काँग्रेससोबत राहिले तर अनेक कार्यकर्ते पाच वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जुळले. मात्र बहुतांश जणांना ना कसली ओळख मिळाली ना त्यांना हवा तो सामाजिक मान मिळाला. १०० वर्षांच्या कालावधीत काही पदाधिकाऱ्यांची नावे रस्ते किंवा वस्त्यांना देण्यात आली, तर काहींचे पुतळे उभारण्यात आले. मात्र नवीन पिढ्यांपर्यंत त्यांचा आदर्श पोहोचविण्यासाठी कुठलीच पावले उचलण्यात आली नाही.

नागपूरच्या अधिवेशनातच आताच्या बहुतांश राजकीय पक्षांची मुळे आहेत. ते अधिवेशन पक्षासाठी नव्हे तर देशासाठी होते. एरवी पक्षाच्या नेत्यांसाठी कोट्यवधींचे ‘सेलिब्रेशन’ करणाऱ्या राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांना त्या अधिवेशनाची आठवण राहिलेली नाही, हेच नागपूरचे दुर्दैव म्हणावे लागेल. हे होते स्वागत समितीचे सदस्य – जमनालाल बजाज (अध्यक्ष) -एम.आर.दीक्षित (उपाध्यक्ष) -डॉ.बा.शि.मुंजे (सरचिटणीस) -एम.आर.चोळकर, एम.भवानी शंकर (सहसचिव) -एन.आर.अळेकर, ए.एन.चोरघडे, जी.व्ही.देशमुख, डॉ.हरिसिंह गौर, एम.के.पाध्ये, व्ही.एम.जकातदार, एम.आर.बोबडे, नीळकंठराव उधोजी, धुंडिराज ठेंगडी, डब्लू.एच.धाबे, एन.के.वैद्य, डॉ.एल.व्ही.परांजपे, डब्लू.आर.पुराणिक, एम.व्ही.अभ्यंकर, भास्करराव पंडित, जी.ए.ओगले, व्ही.एस.पटवर्धन, के.पी.वैद्य, डॉ.एन.बी.खरे, जी.आर.देव, हिरालाल टिंगुरिया, शिवनारायण बाजपेयी. क्रॉडक टाऊनचे झाले काँग्रेसनगर या अधिवेशनाचे आयोजन शहराच्या वेशीवरील क्रॉडक टाऊन येथे करण्यात आले होते. याशिवाय धंतोलीतदेखील मंडप टाकण्यात आले होते. धंतोलीचे मालगुजार एम.व्ही.अभ्यंकर यांनी त्यासाठी जागादेखील दिली होती. पुढे क्रॉडक टाऊनचे कॉंग्रेसनगर झाले. देशाला दिशा देणाऱ्या या भागातील बहुंताश लोकांनादेखील या जागेचे महत्त्व माहिती नाही, हे जळजळीत वास्तव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.