नलिनी बाळकृष्ण देवपुजारी स्मृती जीवन गौरव पुरस्कार गडकरी यांना प्रदानीत

पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे नितीन गडकरी यांना रविवारी नलिनी बाळकृष्ण देवपुजारी स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शक्तिपीठ रामनगर येथे झालेल्या या कार्यक्रमाला तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, पद्मगंधा प्रतिष्ठानच्या शुभांगी भडभडे, कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू, डॉ. पंकज चांदे, डॉ. सतीश देवपुजारी आदी उपस्थित होते. अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्याची संधी मला प्राप्त झाल्याचे सांगताना गडकरी यांनी सांगितले की, कारगिलच्या भागात मी जोजिला बोगदा बांधत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा हा बोगदा आहे. ब्रह्मपुत्रेवर आणि गंगा नदीवर प्रत्येकी ६ पूल मी बांधले. १३00 किमीचा मुंबई दिल्ली हा ग्रीन एक्सप्रेस येत्या वर्षभरात पूर्ण होईल. गंगा शुद्धीकरण, जलमार्ग वाहतूक सुरू करणे अशी अनेक कामे माझ्या हातून झाली. तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनाच्या काळात मी २८0 व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ८0 कोटी लोकांशी संपर्क केला.

सामाजिक क्षेत्रातही अनेक गरीब लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया, अपंगांना कृत्रिम पाय लावून देण्यास मदत केली. अशा सेवांमध्येच मला आनंद असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, रा. स्व. संघ, अभाविप आणि माझी आई यांनी दिलेल्या संस्कारातून मी घडलो. त्यांनी दिलेल्या संस्काराचा वारसा मला लाभला. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याचा मी भरपूर प्रयत्न केला. पण, त्या कामात अजून पाहिजे तेवढे यश मिळाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. गावागावात आज परिस्थिती खूप खराब आहे. म्हणून गावांचा विकास करण्याचे मी ठरविले आहे. मागास क्षेत्र आणि शेतकरी यांचा आर्थिक व सामाजिक विकास झाला पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. संचालक प्रभा देऊस्कर यांनी केले.

अशक्य कल्पना शक्य करण्यासाठी काम सुरू
अनेक अशक्य कल्पना शक्य व्हाव्यात यासाठी माझे काम सुरू असतात, असे सांगताना गडकरी म्हणाले, शेतकर्‍याने निर्माण केलेल्या इंधनावर वाहने चालावी व हे शहर आणि देश प्रदूषणमुक्त व्हावे, असे माझे प्रयत्न आहेत. देशासाठी, मातृभूमीसाठी काम करायचे. निधीची कमतरता नाही. फक्त इच्छाशक्ती हवी. देशाला सर्वच क्षेत्रात आम्ही खूप पुढे नेऊ शकतो. रा. स्व. संघ, विद्यार्थी परिषद, रा. से. समिती यांच्या शिकवणीतून संस्कार मिळतात व व्यक्तित्व निर्माण होते. या संस्कारांमुळेच मातृभूमीची आणि देशाची सेवा मी करू शकलो, असेही ते म्हणाले.

नागपूरकरांनी संधी दिल्यामुळेच मी नागपुरात आणि भारतभरात मोठमोठी कामे करू शकलो. नागपुरात डबल डेकर पूल बांधला, फुटाळ्यावर जागतिक दर्जाचे कारंजे होणार आहेत. ब्रॉडगेज मेट्रोही लवकरच लोकांच्या सेवेसाठी येणार आहे. ही सर्व कामे लोकांमुळेच होऊ शकली. त्यामुळे या कामाचे श्रेय नागपूरकरांचे आहे. लोकांनी मला सेवेची संधी दिली, त्यामुळेच ही कामे शक्य झाली, असे भावपूर्ण उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, परिवहन व एमएसएमईमंत्री नितीन गडकरी यांनी काढले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.