नाना पटोलेंनी विदर्भाला न्याय मिळवून द्यावा – डॉ. आशीष देशमुख

Share This News

नागपूर, १३ फेब्रुवारी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी झालेल्या आमदार श्री. नाना पटोले यांच्या निवडीचे स्वागत करतानाच, आता नानाभाऊंनी विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा काँग्रेसचे युवा नेते माजी आमदार व अ.भा. काँग्रेस कमिटीद्वारे नियुक्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांसदीय मंडळाचे सदस्य डॉ. आशीष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.


नानाभाऊंनी पदभार स्वीकारला आहे. ते विदर्भातील आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. माझे वडील श्री. रणजितबाबू देशमुख प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी वेगळ्या विदर्भासंबंधीचा ठराव केला होता. त्या ठरावाचा नानाभाऊंनी पाठपुरावा करावा, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.


महाराष्ट्रात व देशाच्या इतर भागांतही काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीत तीन पक्ष असले तरी त्यात काँग्रेसचा प्रभाव जाणवत नाही. तो जाणवायचा असेल आणि पक्ष संघटनेत प्राण फुंकायचे असतील तर नानाभाऊंना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विदर्भाचे नाहीत. सिंचन-उद्योगासारखी महत्त्वाची खाती विदर्भाकडे नाहीत. अशा वेळी सर्व क्षेत्रांत विदर्भाला न्याय मिळायचा असेल तर सरकारमध्ये सहभागी असूनही नानाभाऊंच्या नेतृत्वात काँग्रेसजन विदर्भाला झुकते माप मिळवून दिले पाहिजे अशी विदर्भातील जनतेची अपेक्षा असल्याचे स्पष्ट करून डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे की, नानाभाऊ विदर्भवादी आहेत. त्यांनी आता स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज बुलंद केला पाहिजे. आमचे नेते राहुल गांधी यांचा नानाभाऊंवर विश्वास आहे. त्यांनी स्वतंत्र विदर्भासंबंधी भूतकाळात झालेल्या प्रयत्नांचा सर्वंकष आढावा राहुलजींच्या कानावर घालावा आणि राज्य निर्मितीच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
विदर्भाचा विकास व्हायचा असेल तर स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी गतकाळात भरपूर प्रयत्न झाले. परंतु, त्यांना यश आले नाही. स्वतंत्र विदर्भाची मागणी फार जुनी आहे. अनेकांनी या मागणीचा अभ्यास केला. अनेक प्रकारच्या समित्या व अहवाल झाले. त्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या समितीचा समावेश होता. राज्य पुनर्रचना आयोगाने विदर्भाचे राज्य आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकते असे मत नोंदवले होते. शिवसेना वगळता इतर सर्व पक्षांचे या मागणीला समर्थन आहे. भाजपने तर राष्ट्रीय अधिवेशनात स्वतंत्र राज्याचा ठराव केला होता. त्या ठरावाची नानाभाऊंनी केंद्रातील मोदी सरकारला आठवण करून दिली पाहिजे, असे मतही डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.


नाना पटोले भंडारा जिल्ह्याचे आहेत. हा जिल्हा मागासलेला आहे. त्यांच्या जिल्ह्याच्या अगदी आजूबाजूला असलेल्या छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांचा विकास त्यांच्या डोळ्यासमोर आहे. जोवर वेगळे राज्य होत नाही, तोवर भंडारा-गोंदिया-गडचिरोलीसारख्या मागास भागांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे नानाभाऊंनी या विषयाचे गांभीर्य समजून पावले उचलावीत, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.