कृषी सुधारणांमुळे शेतकर्‍यांना नव्या संधी

Share This News

मन की बात या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

भारतात शेती आणि शेतीशी संबंधित नव्या गोष्टी घडत आहेत आणि या कृषी सुधारणांमुळे शेतकर्‍यांसाठी नव्या संधींची दारे उघडली गेली आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
सविस्तर चर्चा आणि विचारमंथनातून संसदेने कृषी कायदे केले आहेत आणि यामुळे शेतकर्‍यांवर असलेली बंधने रद्द होऊन त्यांना नवीन अधिकार मिळत आहेत असे सांगताना पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील जितेंद्र भोई यांचे उदाहरण दिले. आपल्या मका या पिकाचे राहिलेले पैसे व्यापार्‍याकडून मिळवण्यासाठी जितेंद्र यांना नवीन कृषी कायद्यांचा कसा फायदा झाला ते पंतप्रधानांनी नमूद केले आणि या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदीनुसार शेतकर्‍यांच्या थकीत बिलांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकार्‍यांवर असल्याची त्यांनी माहिती दिली.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी अजिंठय़ाच्या लेण्यांचा वारसा डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या प्रयत्नांचा देखील उल्लेख केला तसेच डॉ. सलीम अली यांच्या जयंतीची देखील पंतप्रधानांनी आठवण केली. परदेशात लोकांना वेदांत आणि गीता शिकवणार्‍या जॉनस मसेट्टी उर्फ विश्‍वनाथ यांच्याबद्दलदेखील पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले तसेच संसदेवर निवडून आल्यानंतर संस्कृत भाषेमध्ये शपथ घेणार्‍या न्यूझीलंडचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर गौरव शर्मा यांचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला.
लंगरची प्रथा सुरू करणार्‍या गुरू नानक देवजींना पंतप्रधानांनी नमन केले व आपणा सर्वांकडून जनतेची सेवा सुरू रहावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. आपल्या शिक्षणाचा आपल्यावरील प्रभाव आणि आपल्या शाळा-कॉलेज विषयी असलेली आपली आत्मीयता कधीही विसरत नाही असे सांगून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आपल्या शाळा-कॉलेज बरोबरचे बंध अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
येत्या ५ डिसेंबरला असणार्‍या अरबिंदो यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण करून आत्मनिर्भर भारतचा मंत्र त्यांच्यापासून प्रेरित असल्याचे सांगितले. येत्या ६ डिसेंबर रोजी असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी सर्वांना एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य पूर्ण करण्याच्या डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणीची आठवण करून दिली. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाबाबत कोणताही निष्काळजीपणा न दाखवण्याचे आवाहन देखील केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.