मराठा आरक्षण ते प्राचीन मंदिरांचे संवर्धन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील नऊ मुद्दे!

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत त्यावरची सरकारची भूमिका स्पष्ट केली

मुंबई: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत त्यावरची सरकारची भूमिका स्पष्ट केली. विरोधकांना फटकारे लगावत, चिमटे काढत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांना हात घातला. मराठा आरक्षण ते प्राचीन मंदिरांच्या संवर्धनावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. त्याचा घेतलेला हा आढावा.

मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही

मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. मराठा आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण कोर्टात वकिलांची फौज उभी केली आहे. ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ओबीसींच्या आरक्षणात कोणीही वाटेकरी नाही

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावणाऱ्यांचाही समाचार घेतला. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाचा एक कणही काढून घेतला जाणार नाही. सर्वांचं आरक्षण आहे तसंच राहील. हे मी रेकॉर्डवर सांगतो, लिहून घ्या, असं सांगत ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. ओबसींचं आरक्षण कमी करणार हे कुणाच्या सडक्या टाळक्यातून आलं माहीत नाही. समाजविघातक शक्तीत जातीपातीत संघर्ष लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आगीवर पाणी टाकावंच लागणार आहे. महाराष्ट्रातील जनताही त्यावर पाणी टाकेल, असं सांगतानाच ओबीसींचं आरक्षण कमी होणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

कुंडल्या बघणारे पुस्तक वाचत आहेत

आम्ही सर्व आरोपांना उत्तर दिली आहेत. पण आता कुणाला मानगुटीवरच बसायचे असेल तर त्याला काय करणार? असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. गेली वर्षभर आमच्या कुंडल्या बघितल्या गेल्या. तुमच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत, असं सांगितलं गेलं. सरकार पाडण्याचे मुहूर्तही काढले गेले. पण कुंडल्या बघणारे आज आमच्या वर्षपूर्तीचं पुस्तक वाचत आहेत, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काढला.

कोरोनाचा धोका टळलेला नाही

यावेळी त्यांनी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याचं स्पष्ट केलं. कोरोनाचा धोका टळलेला नाही, त्यामुळे दोन दिवसांचं अधिवेशन घेण्यात आलं. पण केंद्र सरकारने तर संसदेचं अधिवेशनच घेतलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यानाही टोमणे लगावले. फडणवीस दिल्लीत गेले पाहिजे. त्यांचा अभ्यास चांगला आहे. ते देशाचा विचार करतात. मोठा विचार करतात. त्यांनी दिल्लीत जावं, अशी मुनगंटीवार यांचीही इच्छा आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढताच सभागृहात एकच खसखस पिकली. मुख्यमंत्र्यांनी हा चिमटा काढताच, आमच्या मित्राच्या तुम्ही का मागे लागलात? असा टोला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. त्यामुळे सभागृहात हास्याच्या कारंज्या उडाल्या.

नशीब सरनाईकांना नातू नाही, त्याचीही ईडीने चौकशी केली असती

ईडीच्या चौकश्यांवरूनही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. प्रताप सरनाईक यांची ईडीने चौकशी केली. त्यांच्या मुलाचीही चौकशी केली. नशीब त्यांना नातू नाही, नाही तर त्याचीही चौकशी केली असती. काय आहे हे? हे तर विकृत राजकारण आहे, अशी टीकाही त्यांनी केली. ईडी आणि सीबीआयचा वापर करून आपली अब्रू चव्हाट्यावर मांडू नका, असं आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला केलं.

मेट्रोत मिठागर टाकू नका

मेट्रोच्या मुद्द्यावरून होत असलेल्या टीकेचा मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी समाचार घेतला. आज मेट्रोला विरोध केला जातोय. मोक्याच्या जागेवर मेट्रो बांधली जात आहे म्हणून टीका होतेय. मागणी नसताना कांजूरमार्गमध्ये कारशेड होत असल्याचीही टीका केली जात आहे. कारशेडची मागणी नव्हती म्हणणाऱ्यांनी बुलेट ट्रेनची तरी मागणी होती का ते सांगावं?, असं आव्हानही त्यांनी दिलं. बुलेट ट्रेनची मागणी कुणी केली होती? कुणीच नाही. आपल्याला किती स्टेशन मिळणार आहेत? तर फक्त चारच आणि अहमदाबादला महाराष्ट्रातून किती लोक जाणार आहेत? असे सवाल करतानाच राज्याच्या हिताविरुद्ध कोणी राजकारण करू नये. बुलेटसाठीही मोक्याच्या जागा अडवल्या आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे कारशेडमध्ये मिठाचा खडाच नव्हे तर मिठागरही टाकू नका, असा टोलाही त्यांनी लगावला. मेट्रोची मान्यता न घेता किती पैसे वाढेल याची माहिती येणारच आहे. घाबरू नका. यथावकाश ही माहितीही जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकरी अतिरेकी?

दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. अतिरेकी म्हटलं जातंय. पाकिस्तान आणि चीनची त्यांना मदत मिळत असल्याच्या वल्गनाही होत आहेत. ही आपली संस्कृती आहे का? असा सवाल करत ठाकरे यांनी भाजपला घेरलं. देश आणि राज्याला मातीत घालणारं राजकारण सोडा, असं आवाहनही त्यांनी केलं.

प्राचीन मंदिरांचं संवर्धन

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली. येत्या काही वर्षात राज्यातील प्राचीन मंदिराच्या संवर्धनासाठी विशेष काम करण्यात येणार आहे. त्यासाठी निधी राखून ठेवण्यात येणार आहे. मंदिरांचं संवर्धन करतानाच पर्यटकांना सुविधा मिळाव्यात याकडेही लक्ष देण्यात येणार असल्याचं सांगतानाच मंदिरांच्या संवर्धनासाठी कोणती कोणती प्राचीन मंदिरं घ्यायची याच्या सूचना करा, असं आवाहनही त्यांनी विरोधकांना केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.