नागपुरात कठोर निर्बंध लावण्याचा कुठलाच निर्णय झालेला नाही- वडेट्टीवार

नागपूरः नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कारण देत कठोर निर्बंध लागू करणार असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कठोर निर्बंधांवर सरकारमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही, असे सांगत राऊत यांच्या घोषणेतील हवाच काढून घेतली.
नागपुरात येत्या दोन-तीन दिवसांत कठोर निर्बंध लावावे लागतील, अशी घोषणा राऊत यांनी सोमवारी केली होती. त्यावर विचारले असता वडेट्टीवार यांनी सांगितले की, राऊत यांनी केलेली घोषणा आपणही ऐकलेली आहे. यावर त्यांचे मुख्यमंत्र्‍यांशी काही बोलणे झाले काय, याची आपल्याला माहिती नाही. मात्र, कठोर निर्बंधांबाबत सरकारमध्ये तरी कुठलीच चर्चा झालेली नाही. लॉकडाऊन करावे लागले तर ते कुठल्या जिल्ह्यासाठी नाही तर राज्यासाठी असेल, असेही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी कोरोनाची रोजची रुग्णसंख्या पाचशे ते सहाशेच्या घरात होती. कालची रुग्णसंख्या साडेतीन हजार इतकी आहे. त्यामुळे सरकार सावध आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.