आता राज्य सरकानेही दहा हजार रुपयांचे अनुदान द्यावे, बावनकुळेंची मागणी

Share This News

नागपूरः केंद्र सरकारने १५ हजार कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेत्लयावर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेश महासचिव व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेतल्याने आघाडीच्या नेत्यांची श्रेयाची संधी हुकली आहे, अशी टिप्पणी करून बावनकुळे म्हणाले की, या नेत्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना शेतीच्या पावसाळापूर्व मशागतीसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट अनुदान मिळवून द्यावे. प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत खत वितरण होईल, याची जबाबदारी घ्यावी. गेल्या काही वर्षांत खतांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना खत दरवाढीपासून दिलासा देणारे धोरणच आखले गेले नव्हते. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने खतावरील अनुदान १४० टक्क्यांनी वाढवून शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी दहा हजारांचे रोख अनुदान जाहीर करावे. दर वर्षी काळाबाजार, साठेबाजी आणि आर्थिक अडवणूक यांमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेएवढे खत राज्यात उपलब्ध होत नाही. गेल्या वर्षीही खताच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी नाडला गेला होता. तशी वेळ येऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने खत वितरणाची प्रणाली आखून द्यावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान योजनेअंतर्गत २० हजार ६६७ कोटींचा निधी जमा केला असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांस झाला आहे. आता खतांच्या दरवाढीचा बोजा उचलून मोदी सरकारने शेतकऱ्याच्या शिरावरील भार हलका केला आहे. आता शेतकऱ्यांना वेळेत, गरजेएवढे खत मिळेल हे पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्यातील शेतकऱ्यास खरीप हंगामातील शेतीविषयक कामांसाठी दहा हजारांचे अनुदान त्वरित वितरित करावे, शेतकऱ्यास पीककर्जासाठी बँकांकडून अडवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि खताचा काळाबाजार रोखणारी यंत्रणा तातडीने उभी करावी अशी मागणी त्यांनी केली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.