नंदूरबार : उपचाराअभावी वृद्धेचा तडफडून मृत्यू

नंदूरबार, 08 सप्टेंबर : उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळून रस्ता बंद झाल्याने एका वृद्धेला रुग्णालयात नेता आले नाही. त्यामुळे तिचा वाटेतच तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सिदलीबाई असे या मृत महिलेचे नाव असून त्या जिल्ह्यातील चांदसैली गावातील रहिवासी होत्या.

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्राच्या विविध भागात गेल्या 36 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या इतर भागासोबतच नंदुरबार जिल्ह्यातही पावसाने चांगलेच थैमान घातले. त्यामुळे दरड कोसळून जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेत. यादरम्यान चांदसैली गावातील सिदलीबाई यांची प्रकृती खालावली. गावात उपचाराची व्यवस्था आणि रूग्णांना शहरात घेऊन जाण्यासाठी साधन नसल्यामुळे सिदलीबाई यांच्या वृद्ध पतीने त्यांना खांद्यावर घेऊन जिल्हा रूग्णालयात जाण्यासाठी पायी प्रवास सुरू केला. अनवाणी पायाने सिदलीबाई यांना खांद्यावर घेऊन सुरू असलेली पायपीट त्यांना काही मैल चालल्यानंतर थांबवावी लागली. पावसामुळे दरड कोसळून घाटातील रस्ता बंद असल्यामुळे पुढे जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे उपचारा अभावी तडफडून सिदलीबाई यांचा वाटेतच मृत्यू झाला. दरवर्षी पावसाळ्यात नंदुराबर जिल्ह्यातील चांदसैली ते धडगाव या घाट सेक्शनच्या रस्त्यावरील चांदसैली घाटात पावसाच्या पाण्यासोबत झाडे-झुडपे, दरड आणि मातीचे ढीक कोसळून रस्ता बंद होतो. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी वारंवार निवेदन दिले आहे. परंतु, आजतागायत त्यासंदर्भात उपयायोजना झालेल्या नाहीत. तसेच गावात वैद्यकीय उपचारांची सोय देखील नाही. त्यामुळे दरड कोसळण्याच्या नैसर्गिक घटनेसोबतच प्रशासकीय कामचुकारपणा आणि शासकीय उदासिनता देखील सिदलीबाईच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.