देवरीच्या पंचशील चौकात एकावर कुऱ्हाडीने हल्ला

देवरी,दि.०८- देवरी पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या स्थानिक पंचशील चौकात आज सायकांळी साडेसहा वाजेच्या सुमारास 50 रुपयाच्या वादावरून एकाने कुऱ्हाडीने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. या घटनेतील जखमी गोंदियाला उपचारासाठी नेत असताना दगावल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेतील जखमीचे नाव बच्चनगिरी दौलतगिरी गुंडी (वय57) राहणार  भागी तर आरोपीचे नाव कुणाल रामेश्वर कांबळे (वय18) राहणार पंचशील चौक देवरी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी देवरीच्या पंचशील चौकात राहणाऱ्या रामेश्वर कांबळे याचेकडे फिर्यादी बच्चनगिरी गुंडी हा आपले उधार असलेले 50 रुपये परत मागण्यासाठी आला होता. या पैशावरून फिर्यादी आणि आरोपीचा वडील रामेश्वर या दोघांत किरकोळ वादावादी झाली. याचा राग मनात धरून आरोपी कुणाल याने बच्चनगिरी याच्या मानेवर मागून येऊन कुऱ्हाडीने वार करून जखमी केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून आरोपीस भादंविच्या कलम 307 आणि 504 खाली अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांचे मार्गदर्शाखाली देवरी पोलिस करीत आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.