एक लाख नोकर्‍या लवकरच, भाजप मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

भोपाल : मध्यप्रदेश भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी रोजगार-नोकरीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. शिवराज सिंह म्हणाले की, राज्यातील रोजगार वाढविणे आमचा पहिला उद्देश आहे. त्यामुळे 110 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे पहिल्या टप्प्यात चार हजार लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. फक्त पैशांची गुंतवणूक करणे, असा इतकाच आमचा उद्देश नाही. तर त्यामुळे रोजगार निर्मिती करणे हा मुळ उद्देश आहे. पुढील काही दिवसांत राज्यात एक लाख पदांवर भरती केली जाणार आहे. तसेच स्वंय रोजगारला चालना दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे राज्यात औद्योगिक विकास आणि औद्योगिक गुंतवणुकीचा वेग वाढवायला हवा. कोरोना महामारीच्या संकटातही मागील 17 महिन्यात 384 औद्योगिक कंपन्यांना 840 एकर जमीन देण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 11 हजार कोटी रुपयांचे भांडवल गुंतवण्यात आले आहे. यामध्ये 22 हजार जणांना नोकरी मिळणार आहे. कोरोना संकटाच्या काळातही औद्योगिक कंपन्यांची गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत यामध्ये 48 टक्केंची वाढ झाली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून जमीन वाटपात 32 टक्के, भांडवली गुंतवणुकीत 33 टक्के आणि रोजगार निर्मितीमध्ये 38 टक्केंची वाढ पाहायला मिळाली. राज्यातील गुंतवणूक धोरणे अनुकूल बनवण्यात आली आहेत, त्यामुळेच गुंतवणूकदार आपल्या राज्याला पंसती दर्शवत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.