९/११ दहशतवादी हल्ल्यासंबंधी कागदपत्रे खुली होणार

अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांचा आदेश

वॉशिंग्टन
न्यूयॉर्कमधील जागतिक व्यापार केंद्राच्या (वर्ल्ड ट्रेड सेंटर) जुळ्या मनोर्‍यांवर सन २00१ झालेल्या ९/११च्या दहशतवादी हल्ल्यासंबंधीची काही गोपनीय कागदपत्रे खुली करण्याचे निर्देश अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी दिले. या हल्ल्यास येत्या ११ तारखेस २0 वर्षे पूर्ण होत असून बायडेन यांच्या या निर्णयामुळे या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
या हल्लेखोरांना सौदी अरेबियाच्या काही अधिकार्‍यांनी मदत केल्याचा या कुटुंबीयांचा आरोप आहे. ही कागदपत्रे खुली झाल्यानंतर त्यांच्या न्यायालयीन लढ्यास बळ मिळण्याची शक्यता आहे. ही कागदपत्रे गोपनीय ठेवण्यावरून बायडेन प्रशासन व संबंधित नागरिकांमध्ये संघर्ष सुरू होता. यातील काही जणांनी ९/११ संबंधी स्मृती कार्यक्रमात बायडेन यांचा निषेधही केला होता. दोन दशकांपूर्वी घडलेली ही दुर्घटना समस्त अमेरिकींच्या मनात आजही ताजी आहे. या हल्ल्यातील बळींच्या नातेवाईकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. यामुळेच ही काही कागदपत्रे आता सावर्जनिक करण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया बायडेन यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांनी सौदी अरेबियाविरोधात न्यूयॉर्कच्या संघीय न्यायालयात एक खटला दाखल केला आहे. विमान अपहरणकर्त्यांपैकी १५ जण सौदीचे नागरिक होते व सौदीच्या अधिकार्‍यांनी या हल्लेखोरांना अनेक प्रकारे मदत केली, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. सौदी अरेबियाने हे आरोप फेटाळले आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.