तालिबानच्या वाटचालीवर आमचे लक्ष

वॉशिंग्टन
अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केल्यानंतर कमी अवधीतच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. तालिबानवर अमेरिकेने काही निबर्ंध लावले आहेत. तर, दुसरीकडे तालिबानसोबत चीन, रशिया आणि पाकिस्तान राजकीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यावर भाष्य केले आहे. तालिबान आणि त्याच्या तीन मित्रांच्या वाटचालीबाबत उत्सुकता असून काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे बायडेन यांनी म्हटले.
बायडेन यांनी म्हटले की, अफगाणिस्तानमधून आम्ही माघार घेतल्यानंतर चीन तालिबानसोबत चर्चा करणार याचा आम्हाला पूर्ण अंदाज होता. चीनला तालिबान त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे चीनने आतापासूनच तालिबानसोबत संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. चीनच नव्हे तर रशिया, पाकिस्तान आणि इराण या देशांकडूनही हेच प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात या देशांकडून तालिबानबाबत काय धोरण घेतले जाईल याची उत्सुकता असल्याचे बायडेन यांनी म्हटले.
अमेरिकेसह जी-७ राष्ट्रसमूहातील काही देशांनी तालिबानसोबत चर्चा केली आहे. मात्र, ही चर्चा हवाई मार्ग सुरू करणे आणि अन्य मुद्यांशी निगडित होती. अमेरिकेने सध्या अफगाणिस्तानच्या रिझर्व्ह फंडवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे तालिबानला त्याचा वापर करता येणार नाही. तर, दुसरीकडे चीन, रशिया, पाकिस्तानसह इतर काही देश तालिबानसोबत राजकीय संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत. चीनने तालिबानला आर्थिक मदत देण्याबाबतचीही घोषणा केली आहे. तालिबाननेही चीनला महत्त्वाचा देश असल्याचे म्हटले. पाकिस्तानने तर अफगाणिस्तानमध्ये उघडपणे हस्तक्षेप सुरू केला आहे. तालिबानच्या मदतीसाठी पाकिस्तानने पंजशीरमध्ये हवाई हल्ले केल्याचे वृत्त होते.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.