पानठेला चालकाच्या खुनानंतर बाजारात भाजीविक्रेत्यास संपविले

नवीन वर्षात सुरू झालेल्या खुनी सत्रामुळे शहरात खळबळ माजली आहे. ८ जानेवारीपासून ११ जानेवारीपर्यंत चार हत्या झाल्या आहेत. शहरात गुन्हेगारी कमी झाल्याचा कांगावा केला जात आहे. मात्र, शहरात दररोज होणार्‍या खून आणि खुनाचा प्रयत्न यामुळे शहरात गुन्हेगारी मोठय़ाप्रमाणात फोफावल्याचे दिसत आहे. गुन्हेगारांना पोलिसांची कोणतीही भीती राहिली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच शहरात कोट्यवधींची फसवणूक सर्रास सुरू आहे. पोलिस मात्र चाकू आणि तलवारी पकडण्यातच गुंतले आहेत.

१५ वर्षांच्या कोवळ्या मुलाचा डीजेत नाचताना धक्का लागल्यावरून झालेल्या भांडणात ८ जणांनी भररस्त्यावर खून केल्याची घटना घडत आहे. तर उसनवारीच्या पैशातून झालेल्या वादातून बौद्ध विहाराच्या दारावर हत्या करण्यात आली. भरवस्तीत चाललेल्या या हत्यासत्रावर पोलिसांच्या धाकाचा कोणताही परिणाम होत नाही. यशोधरानगर हद्दीत मांजरी रेल्वे पटरीजवळ एका पानठेला चालकाची ग्राहकीच्या वादावरून ११ जानेवारीला रात्री हत्या करण्यात आली. रियाजुद्दीन जलालुद्दीन अंसारी (२७) रा. शाहनवाज लेआऊट, चित्सिया चौक, वांजरा असे मृताचे नाव आहे. रियाज याचा मांजरी रेल्वे पटरीजवळ पानठेला आणि त्याच्या पानठेल्यापासून फक्त १0 मीटर अंतरावर अजहर याचा पानठेला आहे. रियाज याच्या पानठेल्यात जास्त ग्राहक यायचे. अजहर याच्या पानठेल्यात कमी ग्राहक यायचे. त्यामुळे अजहरला रियाजशी खुन्नस होती. ग्राहकीवरून त्यांच्यात सारखा वाद व्हायचा. त्यामुळे त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने अजहर, मोहम्मद जावेद आणि मुनीश हे तयारीनिशी पानठेल्यावर तयारच होते. ११ जानेवारीला रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास रियाज आणि त्याचा मित्र आसिम हुसेन वल्द आबिद हुसेन (३१) रा. वांजरा हे दोघेही रियाजच्या आहिल पानठेल्याजवळ उभे होते. दरम्यान, रियाजचा काटा काढण्याच्या तयारीत आधीच असलेला अजहर रियाजच्या जवळ आला. रियाजला काही कळायच्या आत त्याने रियाजच्या डोळ्यात मिर्ची पावडर फेकले. या अकस्मात हल्ल्यात रियाज आणि आसिम दोघेही गोंधळले. काही कळण्याच्या आधी अजहर आणि मो. जावेद यांनी रियाजवर ताबडतोब धारदार शस्त्राने वार केले. मुनीशने लाकडी दांड्याने रियाजला मारून त्याला गंभीर जखमी केले.
याप्रकरणी परिसरातील लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच रियाजला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तीनही आरोपींना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.