शाळांच्या मनमानी कारभाराविरुद्ध पालक संघटना आक्रमक

Share This News

फीसाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालक संघटनांकडून होत आहे. मात्र प्रशासनाकडूवन त्याबाबत कोणतंही पाऊल उचललं जात नाही.

पुणे: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. उत्पन्नाचं साधन संपलं. अशावेळी मुलांच्या शाळेची फी भरणंही अनेकांना जड जात आहे. त्यात शाळेची फी भरली जात नसल्यानं शाळांकडून ऑनलाईनचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील जवळपास 1 हजार 400 शाळांनी तीन दिवस ऑनलाईन शिक्षण बंद केलंय. त्याविरोधात आता पालक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. पालक संघटनांचे प्रतिनिधी आज शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. (Parents’ association will meet Minister of State Bacchu Kadu)

फीसाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालक संघटनांकडून होत आहे. मात्र प्रशासनाकडूवन त्याबाबत कोणतंही पाऊल उचललं जात नाही. त्यामुळे पालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज पालक संघटनांचे प्रतिनिधी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. ही भेट मंत्रालयात दुपारच्या सुमारास होण्याची शक्यता आहे. फीसाठी तगादा लावणाऱ्या आणि ऑनलाईन शिक्षण बंद करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी पालक संघटना करु शकतात.

पुण्यातील खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण बंद!

कोरोनामुळे अनेक पालक आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरु शकले नाहीत. त्यामुळे शाळांचंही मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. शिक्षकांचे पगार देण्यासही शाळांकडे पैसा नाही. अशा स्थितीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे आणि पिंपरीमधील जवळपास 1 हजार 400 खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहेत. आजपासून गुरुवारपर्यंत म्हणजे तीन दिवस हे ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ स्कुल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी घेतला आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी केली आहे.

पुणे महापालिकेच्या शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद

दुसरीकडे पुणे महानगरपालिकेतील सर्व शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग आणि पालकांचा हमीपत्राला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. पिंपरी-चिंचवडमध्येही 3 जानेवारीपर्यंत शाळा बंदच राहणार आहेत. तिथल्या महापालिका प्रशासनाचा हा निर्णय आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.