महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, केरळमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण, केंद्राकडून हाय अलर्ट

मुंबई / नवी दिल्ली, २३ जून : कोरोना पाठोपाठ आता महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट जाहीर केले आहे. तसेच या तीनही राज्यांना केंद्र सरकारने हाय अलर्ट दिला आहे.
प्रसार जलदगतीने
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भारतीय सार्स कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियमने सूचना दिल्या आहेत की, डेल्टा प्लस व्हेरिएंट सध्या ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ आहे. याचा प्रसार जलदगतीने होत आहे. 
लसींमुळे किती प्रमाणात ॲन्टीबॉडी तयार होतात हे अस्पष्ट
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासहित ८० देशांमध्ये सापडला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत तसेच केरळ आणि मध्यप्रदेशमध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या राज्यांना अलर्ट करण्यात आले आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी या व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहेत. पण या लसींमुळे शरीरात किती प्रमाणात ॲन्टीबॉडी तयार होतात हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचही भूषण यांनी सांगितले.
महाराष्ट्रात २१ रुग्ण
दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले की, राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील रत्नागिरी ९, जळगाव ७, मुंबईत २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 
भारतासोबतच अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, जपान, पोलंड, नेपाळ आणि रशियातही या प्रकारचे रुग्ण सापडले आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.