केंद्र सरकारच्या विचाराचे जे लोक राज्यात आहेत त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे – शरद पवार

पुणे, 5 सप्टेंबर (हिं.स.) – राज्यात भाजप, मनसे या पक्षांनी मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनांबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, केंद्र सरकारने राज्य सरकारांना कोरोना साथीसंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात आणखी काही दिवस खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. “अन्य घटकांची याबाबत काही मते असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र केंद्र सरकारच्या विचाराचे जे लोक राज्यात आहेत त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे,” असा चिमटा पवारांनी भाजपा नेत्यांना काढला.

राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपा नेते सातत्याने आंदोलन करत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात पुण्यात मंदिरात आरती करुन आंदोलन केले होते. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. ”करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री त्याचे कटाक्षाने पालन करत आाहेत. या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सुसंवाद आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विचारांच्या राज्यातील लोकांनी तारतम्य बाळगावे,” असे म्हणत पवार यांनी मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.