विवाहित मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाची हत्या

नागपूर – दारूच्या नशेत पोटच्या विवाहित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला मुलीच्या दिराने मारहाण करून त्याची हत्या केली.

पिपळा हुडकेश्वर भागात रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. हरिलाल मोहनलाल गोस्वामी (वय ५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी नितीन नत्थूलाल सोळंकी आण राजू हरिलाल राठोड या दोघांना ताब्यात घेतले. मृतक गोस्वामी हा मुळचा असिनपूर (लखनऊ, उत्तरप्रदेश) येथील रहिवासी होय. त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. मुलगी सुमन (काल्पनिक नाव) मानसिकरित्या कमकुवत आहे. तिचा पती आणि त्याचे कुटुंबीय लॉकडाऊनपूर्वी गल्लोगल्ली फिरून चादर विकत होते. लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाल्याने ते आता हातमजुरी करतात. लॉकडाऊनच्या दरम्यान गोस्वामी मुलीच्या घरी आला होता. काचेच्या वस्तू बनवून तो विकायचा. हा व्यवसाय चांगला चालत असल्याने तो मुलीच्याच घरी राहू लागला. मात्र, छोट्याशा घरात अडचण होत असल्याने १५ दिवसांपूर्वी त्याला सुमनच्या कुटुंबीयांनी हुसकावून लावले. त्यामुळे बाजुच्याच एका पडक्या शेडमध्ये तो राहू लागला. तो सुमनलाही तेथे नेत होता. वडिल असल्याने सुमनच्या कुटुंबीयांना संशय घेण्याचे कारण नव्हते. रविवारी सुमनच्या घरी चिकन बनविले. त्यामुळे वहिनी आणि तिच्या वडिलांना डबा देण्यासाठी सुमनचा दीर नितीन सोळंकी त्याचा मित्र राजू हरिलाल राठोडसोबत रविवारी रात्री १० च्या सुमारास शेडमध्ये आला. यावेळी दारूच्या नशेत टुन्न असलेला गोस्वामी सुमनवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसला. ती विरोध करीत असल्याचेही नितीनने बघितले. त्याचा संताप अनावर झाला. नितीन आणि राजूने गोस्वामीची धुलाई सुरू केली. मारहाणीत तो जमीनीवर पडला. खाली दगड असल्याने गोस्वामीचे डोके ठेचले गेले. तो निपचित पडल्याचे पाहून आरोपी नितीन आणि राजू निघून गेले. दरम्यान, सोमवारी सकाळी गोस्वामीचा मृतदेह पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. हुडकेश्वरचे ठाणेदार प्रताप भोसले आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. तो हत्येचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर मृतदेह मेडिकलला पाठवून त्यांनी वरिष्ठांना कळविले. त्यानंतर परिमंडळ चारचे उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. सुमनकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी नितीन आणि राजूला ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.