कृषी कायदा, शिक्षण धोरणावर मंथन होणार

‘अभाविप’ केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा; संघभूमीत आजपासून राष्ट्रीय अधिवेशन

नागपूर : तब्बल २५ वर्षांनंतर संघभूमीत होऊ घातलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात सुरू आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संघटनात्मक बांधणी आणि ‘अभाविप’च्या विविध सेवाकार्यासह नवीन शैक्षणिक धोरण आणि कृषी विधेयकावर विषेश मंथन करण्यात आले. दोन दिवसीय अधिवेशनात येणाऱ्या प्रस्तावांवर नवीन सूचनांवर चर्चा करत कृषी कायदा व नवीन शिक्षण धोरणावर जनतेमध्ये सकारात्मक संदेश पोहचवावा अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अभाविपच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे शुक्रवारी दुपारी ३ वाजता संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सकाळी १० ते सायंकाळपर्यंत डॉ. हेडगेवार स्मारक समिती येथे संपन्न झाली. बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. सुब्बैय्या, सरचिटणीस निधी त्रिपाटी, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रो. छगन पटेल यांच्यासह केंद्रीय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीला अधिवेशनात येणाऱ्या प्रस्तावावर चर्चा झाली. यानंतर केंद्रीय कार्यसमितीच्या सदस्यांना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. सुब्बैय्या मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भारताचा सांस्कृतिक प्रवाहाचा समृद्ध वारसा अखंडपणे वाहत असून यात अभाविपने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अभाविप प्रयत्न करीत आहे. मात्र, काही लोक अद्याप वसाहतवादी मानसिकता सोडण्यास तयार नाहीत. त्यांनी आपला हा ढोंगीपणा सोडून त्यांनी भारतीय संस्कृतीशी आपला परिचय करायला हवा असेही ते म्हणाले. भारत सरकारने शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील मोठय़ा सुधारणांच्या दिशेने पावले उचलली असून अभाविप त्याचे स्वागत करते. यामुळे देशात सकारात्मक बदलाची आशा आहे. आमचे युवा कार्यकर्ते देश आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने वचनबद्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सरचिटणीस निधी त्रिपाठी यांनी करोना काळात अभाविच्या कार्यकर्त्यांनी देशभरात केलेल्या विविध सेवाकार्याची माहिती दिली.

संघटनात्मक कार्याचा आढावा

अधिवेशनानिमित्त दिवसभर चाललेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सायंकाळी राष्ट्रीय कार्यकारिणी परिषदेच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील प्रांत मंत्री आणि प्रत्येक प्रांतामधून एक कार्यकर्ता अशा ४७० जणांनी भाग घेतला होता. यामध्ये संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. याशिवाय येणाऱ्या काळात सदस्यता नोंदणीला महत्त्व देण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रदर्शनातून सेवाकार्याची झलक

करोना काळामध्ये अभाविच्या वतीने देशभरात विविध सेवाकार्य करण्यात आले. याची झलक म्हणून अधिवेशन स्थळाच्या बाहेर प्रदर्शन लावण्यात आले आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भूपेंद्र सिंह, नागपूर महानगर अध्यक्ष श्रुती जोशी, सरचिटणीस करण खंडाळे यांची उपस्थिती होती. या प्रदर्शनात विविध छायाचित्रांच्या माध्यमातून सेवाकार्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.