महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार प्रदान | Presented three awards of Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi to Maharashtra

नवी दिल्ली,दि.25 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषी व कृषी कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते आज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने केंद्रीय कृषी व कृषी कल्याण मंत्रालयाच्यावतीने येथील पुसा कॉम्प्लेक्स परिसरातील ए.पी.शिंदे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या योजने अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे राज्य व निवडक जिल्ह्यांना केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्राला एकूण तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय कृषी व कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल, महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश , अरूणाचल प्रदेश या राज्यांचे कृषिमंत्री यावेळी उपस्थित होते.

राज्याच्या कृषी विभागाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त धिरज कुमार  यावेळी उपस्थित होते.

या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी ५ टक्के लाभार्थ्यांची  तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यात ४ लाख ६८ हजार ७४७ शेतकऱ्यांची जिल्हा, तालुका व गाव निहाय यादी प्राप्त झाली होती. त्यातील  ९९.५४ टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण करून राज्याने देशात उत्कृष्ट कार्य केले.तसेच राज्यात या योजनेसंदर्भात जवळपास ३८ हजार ९९१ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी २३ हजार ६३२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. या दोन्ही उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून महाराष्ट्राला या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांचाही सन्मान

या योजनेंतर्गत तक्रार निवारणात उत्कृष्ट कार्य करत देशातील उत्कृष्ट जिल्हा ठरलेल्या पुणे  जिल्ह्याला यावेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे  यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेंतर्गत पुणे जिल्ह्याने प्राप्त २२७८  तक्रारींपैकी २०६२  तक्रारींचा निपटारा करून देशात प्रथम क्रमांक पटकाविला .

या योजनेंतर्गत लाभार्थी भौतिक तपासणीच्या कामात देशात सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा मान पटकाविणाऱ्या अहमदनगर जिल्हयाला यावेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अहमदनगर जिल्ह्याने लाभार्थी भौतिक तपासणी अंतर्गत २८ हजार ८०२ लाभार्थींपैकी सर्वच अर्थात १०० टक्के तपासणी पूर्ण करून देशात उल्लेखनीय कार्य केले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत १.१४ कोटी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली असून आतापर्यंत साधारण १.०५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ६३३ कोटी रुपये जमा झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.