‘विघातक शक्ती काही काळासाठी राज्य करू शकतील, कायमस्वरुपी नाही’

तालिबानच्या उदयावर पंतप्रधान मोदींचे अत्यंत सूचक विधान

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबान राज येणार हे स्पष्ट झाले आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सूचक विधान केले आहे. ‘विनाशकारी शक्ती आणि लोक, जे दहशतीच्या विचाराने साम्राज्य उभे करण्याचा विचार करतात, त्यांचे काही वेळसाठी वर्चस्व निर्माण होते. पण त्यांचे अस्तित्व कायमस्वरुपी नसते. ते मानवतेचा आवाज दडपू शकत नाही’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते गुजरातच्या सोमनाथ मंदिराच्या कार्यक्रमात बोलत होते.
तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यावर पंतप्रधान मोदींनी केलेले हे अत्यंत सूचक विधान आहे. गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या काही प्रकल्पाचे त्यांनी व्हर्च्युअल उद्घाटन केले. ‘अनेक वेळा सोमनाथ मंदिर उद्धवस्त करण्याचा प्रयत्न झाला. मुर्त्यांची विटंबना करण्यात आली. मंदिराचे अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न झाला. पण प्रत्येक विनाशकारी हल्ल्यानंतर मंदिर पुन्हा वैभवाने उभे राहिले. त्यातून आपल्याला आत्मविश्वास मिळतो,’ असे मोदी म्हणाले. ‘प्रवास आणि पर्यटनाच्या इंडेक्समध्ये भारत २०१३ साली ६५ व्या स्थानावर होता. तो २०१९ साली ३४ व्या स्थानावर पोहोचल्याचे, मोदी म्हणाले. सोमनाथ मंदिर गुजरातमधील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून जगभरातून येथे भाविक दर्शनासाठी येत असतात.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.