खून व शारीरिक गुन्हे रोखण्याला प्राधान्य; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

उपराजधानीतील भूमाफियानवर कडक कारवाई करण्यात येईल .

नागपूर : शहरातील खुनाचे प्रमाण आणि शारीरिक गुन्हे रोखण्याला पोलिसांचे प्राधान्य आहे. पण, बनावट दस्तावेजाद्वारे जमीन बळकावणे, बळजबरीने लोकांच्या भूखंडावर कब्जा करणाऱ्या भूमाफियांची नांगी ठेवण्याचा संकल्प उपराजधानीच्या पोलिसांनी केला आहे, असा गर्भित इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

आज बुधवारी नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि प्रेस क्लबच्या वतीने पोलीस आयुक्तांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यापूर्वी उपराजधानीत काम केलेले आहे. त्यामुळे शहर पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डोळ्यासमोर प्रथम शहरातील खुनाच्या घटना रोखणे आणि शरीराविरुद्धचे गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता जुगार, मटका, अवैध दारू विक्री, भूखंड बळकावणे, वाळूची तस्करी आदी प्रकारचे अवैध धंदे खुलेआम व पोलिसांच्या आशीर्वादाने अजिबात चालणार नाही, याचे निर्देश देण्यात आले. त्यासाठी  सर्व गुन्हेगारांना बोलावून ‘आता सुधरा, अन्यथा आम्ही सुधारू’ असा सज्जड दम देण्यात आला. त्यांच्या जनता दरबारमध्ये ५० तक्रारींवर चर्चा झाली असून त्यापैकी ८ तक्रारींमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी ४ प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून उर्वरित प्रकरणात जिल्हा उपनिबंधक, भूमी अभिलेख आणि महसूल विभागातूनही शहानिशा करण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात सरकारी अधिकारी दोषी दिसल्यास त्यांनाही सहआरोपी करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी यावेळी दिला.

कायदा हाती घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई

राजकीय पुढाऱ्यांकडून जनतेचे प्रश्न उचलणे स्वाभाविक आहे. पण, जनतेचे प्रश्न सरकारी अधिकारी किंवा पोलिसांसमोर घेऊन जाताना कायदा हाती घेणे योग्य नाही. कायदा हाती घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.  असेही पोलीस आयुक्तांनी ठणकावून सांगितले.

वाहतूक सुधारण्यासाठी २० पथके

शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक पोलिसांची २० विशेष पथके तयार करण्यात येणार आहेत. दहा पथकांकडे वाहतूक व्यवस्था नियंत्रित करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे आदी कामे असतील. उर्वरित दहा पथके रस्त्याच्या कडेला बेवारस उभ्या राहणाऱ्या वाहनांची शहानिशा करतील व त्यांच्या मालकांना नोटीस बजावतील. अन्यथा ती वाहने पोलिसांकडून जप्त करून रस्ते मोकळे करण्यात येतील. रस्त्यावरील दुकान व व्यावसायिक प्रतिष्ठानांनाही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यासंदर्भात आदेश देण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.