महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. चाहर यांची मागणी

अतिवृष्टीने महाराष्ट्रातील उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने पंचनाम्यांची वाट न बघता तातडीने थेट मदत करावी , अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजकुमार चाहर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोन्डे , भाजपा प्रदेश माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.

खा. चाहर म्हणाले की, गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे अपरिमीत नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यासाठी राज्य सरकारला पंचनाम्यांची वाट पाहण्याची मुळीच गरज नाही. जिल्हा आणि तालुका स्तरावरील शासकीय यंत्रणेकडून नुकसानीचे अहवाल घेऊन सरकारने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याविषयी अद्यापही कोणतीच हालचाल झालेली नाही. सत्तेवर येण्यापूर्वी आघाडी सरकारमधील पक्षांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी २५ हजार रु. बागाईत जमिनीसाठी हेक्टरी ५० हजार आणि फळबागांसाठी हेक्टरी १ लाख रु. एवढ्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता सत्तेत आल्यानंतर या पक्षांना आपल्या मागण्यांचा विसर पडला आहे. अन्यथा या सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई घोषित केली असती. राज्य सरकारने केंद्राकडे शेतकऱ्यांना द्यावयाच्या भरपाईसाठी मदतीचा प्रस्ताव सादर केलेला नाही.

आजवर काँग्रेसने सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गेल्या सहा वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले तीन नवे कायदे देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतीकारक परिवर्तन करणारे आहेत. या कायद्याचे परिणाम काही दिवसांनी दिसतील. या कायद्याला काँग्रेस कडून केवळ राजकीय कारणांसाठी विरोध करीत आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदा मिळू लागला तर शेतकरी वर्ग आपल्या पाठीशी उभा राहणार नाही , अशी भीती वाटू लागल्यानेच काँग्रेसने या कायद्याला विरोध केला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये या कायद्याबाबत गैरसमज पसरविले जात आहेत. या कायद्याविरोधात सुरु असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी किसान मोर्चातर्फे देशव्यापी जनसंपर्क मोहीम हाती घेण्यात आली आहे, असेही खा. चाहर यांनी नमूद केले.

यावेळी खा. चाहर यांनी मोदी सरकारने शेतमालाच्या वाहतुकीसाठी सुरू केलेली किसान रेल्वे , स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी निर्णयांचीही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.