पुणे – महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये ‘आऊटसोर्सिंगद्वारे’ वैद्यकीय अधिका-यांसह कर्मचा-यांची नेमणूक

पुणे 9 सप्टेंबर

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयासह इतर नऊ रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिका-यांपासून स्टाफनर्स, पॅरामेडीकल स्टाफसह इतर कर्मचा-यांची आऊटसोर्सिंगद्वारे नेमणूक केली जाणार आहे. या रूग्णालयांमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी तीन ठेकेदारांची दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र, सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे तीन महिन्यांसाठी ही कंत्राटी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी 11 कोटी 75 लाख रूपये खर्च होणार आहे. तर, दोन वर्षासाठी या रूग्णालयांमधील 1 हजार 38 कर्मचा-यांवर 94 कोटीचा खर्च होणार आहे.

महापालिकेच्या 700 खाटांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयासह यमुनानगर रूग्णालय, थेरगाव, जिजामाता, सांगवी, नवीन भोसरी, जुने भोसरी, जुने आकुर्डी, तालेरा आणि आकुर्डीतील नवीन रूग्णालय ही नऊ रूग्णालये आहेत. या रूग्णालयांमध्ये महापालिकेचा कायमस्वरूपी अधिकारी, कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. तसेच महापालिकेतर्फे वैद्यकीय अधिका-यांपासून इतर पॅरामेडीकल स्टाफची सहा महिने कालावधीसाठी मानधनावर नेमणूक केली जाते.

मात्र, महापालिकेने आता वायसीएम रूग्णालयासह इतर नऊ रूग्णालयांमधील कर्मचारी भरतीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिका-यांपासून स्टाफनर्स, पॅरामेडीकल स्टाफसह इतर कर्मचा-यांची आऊटसोर्सिंगद्वारे नेमणूक केली जाणार आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.