कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून परमवीर यांच्यासह रश्मी शुक्ला यांना समन्स

पुणे, 23 ऑक्टोबर : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता, तर ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाडा येथे एल्गार परिषद घेण्यात आली होती. तेव्हा रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. तसेच परमवीर यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून एल्गार परिषदेशी निगडित अटक आरोपींकडील काही जप्त केलेले पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले होते. त्यामुळे या दोघांची साक्ष महत्त्वाची असून त्याअनुषंगाने त्यांच्याकडील माहितीचा आयोगाला उपयोग होईल. परिणामी या दोघांची साक्ष आयोगासमोर व्हावी, असा अर्ज आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी आयोगाकडे सादर केला होता. हा अर्ज मान्य करत आयोगाने राज्याच्या गृह विभागामार्फत परमवीर आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावले आहे. ८ नोव्हेंबर रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.