रब्बीची ९३ टक्क्यांवर पेरणी पूर्णत्वाकडे

Share This News

नागपूर
यंदा जिल्ह्यात पाऊसही सरासरीच्या वर पडला. याशिवाय पूर परिस्थितीमुळे अनेक तालुक्यातील खरीप पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पीक शेतकर्‍यांच्या घरात येण्याच्या अगोदरच पुराने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. यामुळे शेतकरी मोठय़ा संकटात सापडला आहे. मात्र, हा पूर व पाऊस रब्बी हंगामाला पोषक ठरत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा ‘रब्बी लागवड क्षेत्रात वाढ होण्याची चिन्हे असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते. सध्यस्थितीत जिल्ह्यात रब्बीची एकूण नियोजित क्षेत्राच्या ९३ टक्क्यांवरील पेरणी पूर्णत्वास आली आहे.
यंदा पावसाने जिल्ह्यात जवळपास सरासरी पार केली आहे. सोबतच अतवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जमिनीत ओलावा कायम आहे. त्याचा फायदा रब्बी पिकांना होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, मिरची, भाजीपाला आदी प्रमुख पिके घेतली जातात. रबीचे जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ७३ हजार ५४७ हेक्टर इतके आहे. गतवर्षी जिल्ह्यात रब्बीमध्ये कृषी विभागाने १.५५ लाख नियोजित क्षेत्र होते. त्यापैकी १ लाख ५८ हजारावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यंदा कृषी विभागाने रबीसाठी सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा ३ हजार ६५३ हेक्टर अधिकचे म्हणजेच १ लाख ७७ हजार २00 हेक्टरचे एकूण नियोजन केले आहे. यंदा रबी हंगामामध्ये गव्हाचे ८५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभर्‍याचे ८६ हजार हेक्टरवर लागवड क्षेत्र राहणार असून, त्याखालोखाल रब्बी ज्वारी, मका आदींचा समावेश आहे. वर्ष २0१८-१९ मध्ये जिल्ह्यात रबीची १.६३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. २0१९-२0 मध्ये १ लाख ५८ हजारावर पेरणी झाली होती. यंदा जिल्ह्यात पाऊसही चांगला झाला व जमिनीतील ओलावा कायम असल्याने पेरणी झपाट्याने व मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यंदा पाऊस चांगला बरसल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचणचाही प्रश्न जवळपास मिटला आहे. त्यामुळे रब्बीमध्ये पाणी जास्त लागणारे गहू व हरभर्‍याची पेरणी वाढून उत्पन्न वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दृष्टीने शेतकरी हरभर्‍याची मोठय़ा प्रमाणात लागवडही करीत आहेत. आज घडिला जिल्ह्यात हरभर्‍याची नियोजित क्षेत्राच्या ९0 टक्क्यांपर्यंत तर गव्हाची ८0 टक्क्यांवर पेरणी आटोपलीही आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.