त्रिपुराचे कारण सांगून इथे अस्थिरता निर्माण करणे योग्य आहे का? : चंद्रकांत पाटील

नाशिक : अमरावती येथे शुक्रवारी त्रिपुरा येथील हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. या घटनाक्रमाला हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले होते. त्याच्या निषेधार्थ आज भाजपाने शहर बंदचे आवाहन केले होते. या बंदला आता हिसंक वळण लागल्याचे चित्र आहे. गाड्यांची तसेच दुकानांची तोडफोड करण्यात येत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
पाटील म्हणाले की, पाच टक्के मुसलमान त्यांच्या धार्मिक नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून हिंसक होतात, त्यावर सुद्धा तुम्ही टीका करत नाही? त्रिपुराचं कारण सांगून इथे अमरावती, मालेगावमध्ये अस्थिरता निर्माण करणे योग्य आहे का? काल अनेक ऑफिसेस आणि दुकाने फोडण्यात आली, त्यावर टीका करा, मुस्लिम मतांची काळजी करु नका, असा खोचक टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
ते म्हणाले, मला खूप कीव येते आणि वाईट वाटते की राजकारणासाठी आपण किती लाचार झालो आहेत. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी थोबाडीत लगावले असते. काय चालले काय हे? राज्य करा, मुस्लिमांची मते मिळवा, 95 टक्के मुसलमान हा देशप्रेमी आहे. मात्र, 5 टक्के जो गडबड करतो, त्याचा निषेध करा ना! मुस्लिमांच्या मतांसाठी हे सगळे करता? असा सवाल त्यांनी केला आहे.
रझा अकादमी भाजपचे पिल्लू आहे यावर म्हणाले की, सगळ्या गोष्टी आमच्याच आहेत का? काय सुरु आहे ही चेष्टा? प्रत्येक ठिकाणी भाजपचाच हात असतो का? एवढ्या एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्त्या झाल्या तरी भाजपचाच हात? तीन पक्ष एकत्र असून तुम्ही दुबळे आहात. सरकार अपयशी आहेत. माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत, आजी गृहमंत्री आता आजारातून उठलेत तर मुख्यमंत्री दवाखान्यात आहेत. सध्या राज्य बाहेरुन चालवले जात आहे. त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीत करायला हरकत नाही. मात्र, शांततेत करा, ते घडत नसेल तर त्याचा निषेध करायला नको का? असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.