‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे’; आठवलेंची टीका

Share This News

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोठी मागणी केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींना भेटून ही मागणी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे, अशी टीकाही त्यांनी यावेळी आघाडी सरकारवर केली.

रिपाइंच्यावतीने आज विक्रमगडच्या दिवेकर वाडी येथे आदिवासी बहुजन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रामदास आठवले यांनी ही मागणी केली. यावेळी कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, रिपाइंचे सुरेश बारशिंग, रिपाइं पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, चंद्रशेखर कांबळे, राम जाधव, सतीश बोर्डे, नंदा मोरे, तेजश्री मोरे, इंदिरा दोंदे, साक्षी बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठा समाजाला एससी, एसटी, ओबीसी कोट्यातून आरक्षण नको

मराठा समाजाला एससी, एसटी आणि ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊन नये. त्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. सवर्ण समाजातील गरिबांना 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकारने केला आहे. त्यात आता जोड देऊन देशातील मराठा, राजपूत आदी क्षत्रिय समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे, असं आठवले यांनी सांगितलं. आगामी जणगणना जातीवर आधारित करावी; जातीनिहाय जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार न्याय वाटा मिळेल, असेही ते म्हणाले.

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे

पालघर तालुक्यात 8 तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. येथे मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे, अशा टीकाही त्यांनी कवितेतून केली. पालघर जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.

भूमिहीनांसाठी मोर्चा

येत्या 25 फेब्रुवारीला संपूर्ण देशात गरीब भूमीहीनांसाठी 5 एकर जमीन देण्यात यावी या मागणीसाठी रिपाइं तर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आरपीआय आणि कुणबी सेना एकत्र आली तर भविष्यात राज्यात मोठी सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल, असे प्रतिपादन यावेळी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.